बीड : केजमध्ये सोयाबीन बियाणे उगवले नाही; महाबीज, जेएस कंपनीविरोधात शेतकऱ्यांच्या तक्रारी
बीड, 12 जुलै (हिं.स.)। आधीच निसर्गाच्या अवकृपेने बीड जिल्ह्यात आणि केज तालुक्यात पाऊस कमी असताना शेतकऱ्यांनी नामांकित कंपनीचे सोयाबीनचे पेरलेले बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. केज तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुमारे
सोयाबीन उत्पादन


बीड, 12 जुलै (हिं.स.)। आधीच निसर्गाच्या अवकृपेने बीड जिल्ह्यात आणि केज तालुक्यात पाऊस कमी असताना शेतकऱ्यांनी नामांकित कंपनीचे सोयाबीनचे पेरलेले बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. केज तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुमारे ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर मुख्य नगदी पीक म्हणून खरीप हंगामात पेरणी केलेली आहे. केज तालुक्यातील साळेगाव, नांदुरघाट, युसुफवडगाव बनसारोळा, तांबवा, मांगवडगाव येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पेरणी केलेले महाबीज कंपनीचे व जे एस कंपनीचे सोयाबीनचे वाण उगवले नाही. सदर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे तक्रारी दाखल केलेल्या आहेत. तक्रारी प्राप्त झाल्या नंतर उपविभागीय कृषी अधिकारी राहुल गायकवाड, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. अरुण गुट्टे, केज तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील गुणवत्ता विभागाचे पवन मुंडे आणि सोनवणे यांनी शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

दुसऱ्यांदा घेतलेले बियाणे निघाले सडलेले

साळेगाव ता. केज येथील शेतकरी संदीपान टोपे या केज येथील विलास जाधव यांच्या आदिती कृषी सेवा केंद्र आणि मशिनरी स्टोअर्स मधून बियाणे खरेदी केलेले बियाणे उगवले नाही; म्हणून त्यांनी कृषी दुकानदार जाधव यांना कळविल्या नंतर पुन्हा विलास जाधव यांच्या कडून महाबीज ६१२ वाणाचे बियाणे खरेदी केले. मात्र त्याची पेरणी करीत असताना त्या बियाण्यात सडलेले आणि खराब बियाणे आढळून आले. ते बियाणे त्यांनी निवडून ठेवले आहे. अशाच प्रकारे साळेगाव येथील शेतकरी सौरव वरपे, एकनाथ इंगळे, जयश्री टोपे, मुकेश गित्ते, कैलास पटणे, शफीक सय्यद, भागवत तिडके या शेतकऱ्यांचे देखील बियाणे उगवलेले नाही.

कृषी शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र डिघोळअंबा ता. अंबाजोगाई, प्रा. अरुण गुट्टे यांनी सांगितले की, आमच्याकडे प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही भेटी देऊन पाहणी केलेली आहे. प्रथमदर्शनी बियाण्याची उगवण क्षमता कमी आढळून आहे. उगवण क्षमता कमी आढळून आलेल्या लॉटचे नमुने प्रयोग शाळेकडे तपासण्यासाठी पाठविण्यात येणार असल्याची कारवाई करण्यात आलेली आहे.

तालुका कृषी अधिकारी, सागर पठाडे यांनी सांगितले की, केज तालुक्यात आता पर्यंत सुमारे ७० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्या पैकी ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झालेला आहे. ज्या वाणाचे सोयाबीन उगवले नाही, त्याचे नमुने आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशावरून त्या बियाण्यांचे नमुने प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत.

शेतकरी पती-पत्नी, जयश्री व संदीपान टोपे म्हणाले की, मी माझ्या आणि पत्नीच्या नावे असलेल्या शेतात पुरेशी ओल आणि वापसा झाल्या नंतर बीज प्रक्रिया करून ५ बॅग २९ जून रोजी सोयाबीन पेरले मात्र दहा दिवसा नंतर देखील ते उगवले नाही. पुन्हा मी दुसऱ्यांदा दुबार पेरणी केली आहे. पहिल्या पेरणीला मला सुमारे ४० हजार रु आणि दुसऱ्या पेरणीला तेवढाच खर्च आला. माझी नुकसान भरपाई मिळायला हवी.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande