आषाढी यात्रेसाठी पंढरपूर आगारात पाच नवीन 'राजमाता जिजाऊ' बस दाखल
सोलापूर, 12 जुलै (हिं.स.) आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांच्या प्रवासाची सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पंढरपूर आगारात पाच नवीन ''राजमाता जिजाऊ'' बस दाखल
Rajmata Bus ST


सोलापूर, 12 जुलै (हिं.स.) आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांच्या प्रवासाची सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पंढरपूर आगारात पाच नवीन 'राजमाता जिजाऊ' बस दाखल झाल्या आहेत. या नवीन बसचे लोकार्पण पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले.

लोकार्पणानंतर आमदार समाधान आवताडे यांनी कार्यकर्त्यांसह नव्या बसमधून प्रवास करून सेवेला शुभारंभ केला. यावेळी पंचायत समितीचे सभापती शुभम आगावणे, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, आधार प्रमुख योगेश लिंगायत, विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, सांगोला स्थानक प्रमुख पंकज तोंडे, नगरसेवक संजय बंदपट्टे, माजी नगरसेवक किरणराज घाडगे, लखन चौगुले, विनोद लटके, द्रोणाचार्य हाके, विनोद सुरवसे, बशीर तांबोळी, आमीन शेख तसेच एसटी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आमदार आवताडे म्हणाले की, आषाढी यात्रेदरम्यान लाखो वारकरी आणि भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असल्याने त्यांना सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे ही एसटी महामंडळाची महत्त्वाची जबाबदारी आहे. नव्याने दाखल झालेल्या पाच 'राजमाता जिजाऊ' बसमुळे यात्रेच्या काळात प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा मिळेल आणि पंढरपूर आगाराची वाहतूक क्षमता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आषाढी यात्रेच्या काळात पंढरपूरकडे जाणाऱ्या विविध मार्गांवर अतिरिक्त बससेवा सुरू करण्यात आली असून, नव्या बसमुळे भाविकांसह स्थानिक नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे. यात्रेदरम्यान वाढणारी प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन एसटी महामंडळाने विशेष नियोजन केले असून, या बस त्या व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग ठरणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande