
लातूर, 12 जुलै (हिं.स.)। चाकूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष करीमसाहेब गुळवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केल्यानंतर नगराध्यक्षपदाचा कार्यभार पुन्हा एकदा उपनगराध्यक्ष साईप्रसाद हिप्पाळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. अल्पावधीतच दुसऱ्यांदा नगराध्यक्षपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आल्याने चाकूरच्या राजकीय वर्तुळात या घडामोडीची विशेष चर्चा रंगली आहे.
यापूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष कपिल माकणे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन नगराध्यक्ष म्हणून करीमसाब गुळवे यांची निवड होईपर्यंत नगराध्यक्षपदाचा प्रभारी कार्यभार साईप्रसाद हिप्पाळे यांनी सक्षमपणे सांभाळला होता. त्या काळात नगरपंचायतीचे दैनंदिन प्रशासन, विकासकामांचा पाठपुरावा आणि विविध प्रशासकीय निर्णयांमध्ये सातत्य राखत त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. आता पुन्हा एकदा करीमसाब गुळवे यांच्या राजीनाम्यानंतर नगराध्यक्षपदाची सूत्रे साईप्रसाद हिप्पाळे यांच्या हाती आली असून, नव्या नगराध्यक्षांची निवड होईपर्यंत नगरपंचायतीचा कारभार त्यांच्या नेतृत्वाखाली चालणार आहे. त्यामुळे प्रशासनात सातत्य राखण्याबरोबरच
प्रलंबित विकासकामांना गती देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले आहे.
दरम्यान, चाकूर नगरपंचायतीच्या पुढील नगराध्यक्षपदासाठी राजकीय हालचालींना वेग आला असून विविध इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नगराध्यक्षपद कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे नागरिकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अनेक नगरसेवक इच्छुक असल्याने पडद्यामागील राजकीय घडामोडींना वेग आला असून, पुढील काही दिवसांत नगराध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis