सांगोल्यात १५ लाखांचा भेसळयुक्त दुधसाठा जप्त; ३७ हजार लिटर दूध जागेवरच नष्ट
सोलापूर, 12 जुलै (हिं.स.)सांगोला तालुक्यातील जवळा परिसरात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत १५ लाख १ हजार २८० रुपये किमतीचा ३७ हजार ५३२ लिटर भेसळयुक्त दुधसाठा जप्त करून जागेवरच नष्ट केला. संबंधित आस्थापनाकडे वैध परवाना नसल्याचेही उघडकीस आले असू
fda


सोलापूर, 12 जुलै (हिं.स.)सांगोला तालुक्यातील जवळा परिसरात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत १५ लाख १ हजार २८० रुपये किमतीचा ३७ हजार ५३२ लिटर भेसळयुक्त दुधसाठा जप्त करून जागेवरच नष्ट केला. संबंधित आस्थापनाकडे वैध परवाना नसल्याचेही उघडकीस आले असून सर्व त्रुटींची पूर्तता होईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.सहाय्यक आयुक्त (अन्न) साहेबराव देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी गणेश कदम आणि सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांनी बुरुंगेवाडी, जवळा येथील 'अंजिक्यराणा मिल्क इंडस्ट्रीज' येथे अचानक छापा टाकला.तपासणीदरम्यान दुधाचे चार नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तसेच आस्थापनातील ३७ हजार ५३२ लिटर दूध जप्त करण्यात आले.तपासणीत अनेक गंभीर अनियमितता आढळून आल्या. दूध संकलन व चिलिंग युनिटकडे वैध अन्न परवाना नव्हता. प्राथमिक स्पॉट टेस्टमध्ये दुधामध्ये पाणी मिसळल्याचे आढळले. तसेच दुधातील एसएनएफ (Solid-Not-Fat) चे प्रमाण विहित मर्यादेपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय खरेदी-विक्रीची पद्धतशीर नोंद ठेवण्यात आलेली नव्हती आणि अन्न सुरक्षा नियमांतील अनुसूची-४ मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचेही तपासात स्पष्ट झाले.दूध हा नाशवंत पदार्थ असल्याने जप्त करण्यात आलेला संपूर्ण साठा नियमानुसार जागेवरच नष्ट करण्यात आला. तसेच आवश्यक त्रुटींची पूर्तता करून वैध अन्न परवाना मिळेपर्यंत संबंधित आस्थापनाने व्यवसाय बंद ठेवावा, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत.ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि सहआयुक्त (पुणे विभाग) दि. वा. भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) साहेबराव देसाई यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande