सोलापूरात आयुष्मान योजनेची संथ गती; ४० लाखांपैकी २४ लाख नागरिक अद्याप कार्डविना
सोलापूर, 12 जुलै (हिं.स.)। गरीब व सर्वसामान्य नागरिकांना गंभीर आजारांवरील मोफत उपचार उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीत सोलापूर जिल्ह्यात अद्यापही अनेक अडथळे कायम आहेत. जिल्ह्यात पात्र असलेल्या ४० लाखांहू
सोलापूरात आयुष्मान योजनेची संथ गती; ४० लाखांपैकी २४ लाख नागरिक अद्याप कार्डविना


सोलापूर, 12 जुलै (हिं.स.)। गरीब व सर्वसामान्य नागरिकांना गंभीर आजारांवरील मोफत उपचार उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीत सोलापूर जिल्ह्यात अद्यापही अनेक अडथळे कायम आहेत. जिल्ह्यात पात्र असलेल्या ४० लाखांहून अधिक नागरिकांपैकी केवळ १६ लाख ८७ हजार जणांचीच आयुष्मान कार्डे तयार झाली असून, सुमारे २४ लाख पात्र लाभार्थी अजूनही या सुविधेपासून वंचित आहेत.

आकडेवारीनुसार, गेल्या साडेतीन महिन्यांत केवळ २९ हजार ४४३ रुग्णांनी आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीचा वेग अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे.केंद्र सरकारची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना एकत्रित करून आयुष्मान भारत योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक संरक्षण दिले जाते.मात्र, आधार कार्ड व रेशन कार्ड लिंक नसणे, लाभार्थ्यांच्या नावातील विसंगती, ऑनलाइन प्रक्रियेतील तांत्रिक अडथळे तसेच ग्रामीण भागातील इंटरनेट सुविधेचा अभाव यामुळे मोठ्या संख्येने पात्र नागरिकांचे आयुष्मान कार्ड तयार होऊ शकलेले नाही.

परिणामी, अनेक गरजू रुग्णांना उपचाराची वेळ आल्यावर कार्ड मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.दरम्यान, जिल्हा प्रशासनाने आयुष्मान कार्ड निर्मितीचा वेग वाढविण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. जिल्हा समन्वयक डॉ. प्रवीण गुंजाळ यांनी सांगितले की, जिल्ह्यात आयुष्मान कार्ड तयार करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. आधार-रेशन कार्ड लिंकिंग आणि कागदपत्रांतील त्रुटी दूर झाल्यानंतर अधिकाधिक पात्र नागरिकांना योजनेचा लाभ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande