सोलापूर-जिल्हा नियोजन समितीची बैठक: निधी वापर आणि विकासकामांवर जोर
सोलापूर, 12 जुलै (हिं.स.)जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या निधीच्या कामांचे प्रस्ताव सर्व शासकीय विभागांनी तात्काळ जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावेत आणि मंजूर निधीचा शंभर टक्के खर्च संबंधित कामांवरच करण्यात यावा, असे निर्
DPDC


सोलापूर, 12 जुलै (हिं.स.)जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या निधीच्या कामांचे प्रस्ताव सर्व शासकीय विभागांनी तात्काळ जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावेत आणि मंजूर निधीचा शंभर टक्के खर्च संबंधित कामांवरच करण्यात यावा, असे निर्देश राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

नियोजन भवनातील समिती सभागृहात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, महापौर विनायक कोंड्याल, खासदार प्रा. ज्योती वाघमारे, ओमराजे निंबाळकर, प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत २०२५-२६ च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ९३५ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच २०२६-२७ साठी सर्वसाधारण योजनेच्या ८४२ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यालाही मंजुरी देण्यात आली.पालकमंत्री गोरे यांनी सांगितले की, २०२५-२६ मध्ये जिल्हा नियोजन समितीने मंजूर झालेला निधी शंभर टक्के खर्च करून राज्यात आदर्श कामगिरी केली आहे. या कामगिरीबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांच्यासह सर्व विभागप्रमुखांचे कौतुक केले. तसेच पालकमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी महादेव घुले यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचाही गौरव केला.यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्यात कमी झालेल्या पावसाबाबत चिंता व्यक्त करत नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आले असून, शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन शेतीपंपांसाठीचा वीजपुरवठा दररोज दोन तासांवरून पाच तासांपर्यंत वाढविण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले. पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर वीजपुरवठा आणखी सुरळीत केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande