
रत्नागिरी, 12 जुलै (हिं.स.) । शाळांमध्ये शाश्वत ऊर्जेचा वापर वाढावा या उद्देशाने अमोघा वेल्फेअर फाउंडेशनच्या आर्थिक सहकार्यातून आणि रेनट्री फाउंडेशनने विविध तीन शाळांमध्ये सौरऊर्जा प्रणाली यशस्वीपणे सुरू केली. या उपक्रमाचा फायदा शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना होणार असून, यामुळे शाळेचा वीज खर्च कमी होण्यास आणि वीज खंडित झाल्यासही संगणकाधारित शिक्षण अखंडित सुरू राहण्यास मदत होणार आहे.
शारदा विद्यामंदिर ( वळके, ता. रत्नागिरी) येथे या प्रणालीचे उद्घाटन झाले. यावेळी शाळेचे शिक्षक, ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय, संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा वांद्री क्र. १ आणि जि. प. आदर्श प्राथमिक शाळा, कुणबीवाडी अशा एकूण तीन शाळांमध्ये ही सौरऊर्जा प्रणाली बसवण्यात आली आहे.
रेनट्री फाउंडेशनचे क्षेत्रीय कामकाज व्यवस्थापक शिवदास वायाळ आणि सहाय्यक किशोर राक्षे यांनी संस्थेच्या ग्रामीण विकासातील कार्याची माहिती दिली. गेल्या आठ वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यात कार्यरत असलेले रेनट्री फाउंडेशन जलसंधारण, शाश्वत शेती आणि स्वच्छ ऊर्जेसारख्या विविध क्षेत्रांत ग्रामविकासासाठी प्रयत्नशील आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांना पूरक असलेला हा उपक्रम दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचे वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी