
छत्रपती संभाजीनगर, 12 जुलै (हिं.स.)। गोकुळधाम परिसरातील नागरिकांच्या खडतर प्रवासाला अखेर पूर्णविराम! आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते २ कोटी ४० लाखांच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले
इंदेवाडी पाणी टाकी ते गोकुळधाम परिसराला जोडणाऱ्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे. मूलभूत सोई-सुविधा योजनेअंतर्गत उपमुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या २ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीतून या महत्त्वाकांक्षी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या विकासकामामुळे गोकुळधाम परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या हालअपेष्टा संपुष्टात येणार असून, परिसराच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
भूमिपूजनानंतर बोलताना आमदार अर्जुनराव खोतकर म्हणाले की, आजचा दिवस गोकुळधाम परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत आनंदाचा आणि समाधानाचा आहे. या रस्त्याची मागणी अनेक वर्षांपासून सातत्याने होत होती. निधी मंजूर झाल्यानंतर काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र त्यावर सातत्याने पाठपुरावा करून सर्व अडथळे दूर करण्यात आले आणि अखेर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर नागरिकांची गैरसोय कायमची दूर होईल आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळेल.
यावेळी त्यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या स्थानिक नागरिक, पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांचे विशेष अभिनंदन करत त्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.
यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, अनेक वर्षांपासून या रस्त्यामुळे नागरिकांना अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. खड्डेमय आणि खराब रस्त्यामुळे वाहनचालक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
आमदार अर्जुनराव खोतकर यांनी आम्हाला अक्षरशः मणक्याच्या त्रासापासून वाचवले. आता हा रस्ता झाल्यानंतर ये-जा करणे सोपे होईल. आमच्या अनेक वर्षांच्या मागणीला न्याय मिळाला, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. महिला भगिनींनीही रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत आमदार खोतकर यांचे आभार मानले.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमास जिल्हा संपर्क प्रमुख पंडितराव भुतेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, नगरसेविका दर्शना झोल, नगरसेवक सौ. उषाताई पांगारकर, नगरसेवक अमोल ठाकूर, नगरसेवक निखील पगारे, सरपंच सर्जेराव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुमित वाघमारे, सुखदेव भुंबर, लक्ष्मणराव (आप्पा) अवघड यांची उपस्थिती होती.
तसेच गुलाबराव पाटील, विष्णू मानकर, कैलास चव्हाण, सुधाकर पवार, मातणे साहेब, कांगणे सर, संतोष शिंदे, गोरखनाथ मदन, दिनेश राठोड, रामेश्वर अनारसे, सौ. मनीषाताई भुंबर, सीताबाई इंगळे, विजय ढवळे, माजी सरपंच बंडू शिंदे यांच्यासह गोकुळधाम परिसरातील नागरिक, महिला भगिनी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिसरात आनंदाचे वातावरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाल्यानंतर गोकुळधाम परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांची प्रलंबित मागणी पूर्ण झाल्याने नागरिकांनी आमदार अर्जुनराव खोतकर यांचे अभिनंदन करत त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. लवकरात लवकर दर्जेदार काम पूर्ण होऊन हा रस्ता नागरिकांच्या सेवेत दाखल व्हावा, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis