
पुणे, 12 जुलै, (हिं.स.)। राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत वारकऱ्यांसोबत पायी वारीचा आनंद लुटला. डोक्यावर तुळशीचे वृंदावन, कपाळी टिळा आणि अत्यंत साध्या वेशात त्यांनी चौधरी वस्तीपासून उरुळी कांचन येथील पालखी विसावा तळापर्यंत सुमारे एक किलोमीटर पायी चालत वैष्णवांच्या भक्तीभावात स्वतःला सहभागी करून घेतले.
उरुळी कांचन येथे राज्य महिला आयोग आणि महिला व बालविकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'महिला उन्नती वारी २०२६' या उपक्रमाच्या शुभारंभासाठी त्या आल्या होत्या. यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. दुपारी पालखी विसाव्यासाठी उरुळी कांचन येथे थांबल्यानंतर त्यांनी वारकऱ्यांसोबत पायी प्रवास केला.
वारीदरम्यान आदिती तटकरे यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रवासातील अनुभव, अडचणी तसेच शासनाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांची माहिती जाणून घेतली. श्री विठ्ठलाच्या भक्तीने भारावलेल्या वैष्णवांच्या श्रद्धा, समर्पण आणि सेवाभावाचा त्यांनी जवळून अनुभव घेतला.
त्यानंतर त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेत ज्येष्ठ वारकऱ्यांचे आशीर्वाद घेतले. तसेच तरुण आणि लहानग्या भाविकांशी संवाद साधत त्यांच्या उत्साहाला प्रतिसाद दिला. आषाढी वारीनिमित्त सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देताना, ही वारी सर्वांसाठी सुरक्षित, सुखकर आणि आरोग्यदायी ठरो, अशी श्री विठ्ठलाच्या चरणी त्यांनी प्रार्थना केली.
दरम्यान, उरुळी कांचन येथील कार्यक्रमानंतर आदिती तटकरे यांनी श्री बालाजी नर्सरी उद्योगसमूहाचे प्रमुख संतोष शितोळे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी परभणीच्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनात त्यांनी सहकाऱ्यांसमवेत सहभाग घेतला. भक्ती, सेवा आणि समाजसंवादाचा संगम अनुभवत त्यांनी वारीतील हा संस्मरणीय क्षण जपला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु