

पुणे, 12 जुलै (हिं.स.)। जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास हवेली तालुक्याची हद्द ओलांडून दौंड तालुक्यातील बोरीभडक येथे दाखल झाला. पालखीच्या आगमनावेळी भाविकांनी पुष्पवृष्टी करत आणि ज्ञानोबा-तुकारामच्या अखंड गजरात तुकोबारायांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
लोणी काळभोर येथील मुक्कामानंतर उरुळी कांचन येथे दुपारचा विसावा घेत पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाला. उरुळी कांचनची हद्द पार करताच दौंड तालुक्यातील बोरीभडक येथे हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेत भक्तीमय वातावरण निर्माण केले.
रविवारी सकाळपासून ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असतानाही वारकरी टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात पंढरीच्या वाटेवर मार्गक्रमण करताना दिसून आले. यावर्षी पालखी सोहळा दौंड तालुक्यात प्रवेश केल्यानंतर काही मिनिटे थांबल्याने परिसरातील भाविकांना संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली.
पालखीच्या स्वागतप्रसंगी दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या वैशाली नागवडे, बोरीभडकच्या सरपंच कविता कोळपे, जिल्हा परिषद सदस्या गायत्री खळदकर, सागर शेलार, साहेबराव पोळ, अविनाश कुदळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन दोरगे, भाजपचे राहुल हंडाळ तसेच पंचायत समितीचे सभापती सुखदेव चोरमले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव धडस, पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, प्रांताधिकारी रेवणनाथ लबडे, तहसीलदार अरुण शेलार, गटविकास अधिकारी अरुण मळभर आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहून पालखी सोहळ्याच्या नियोजनावर लक्ष ठेवत होते.
दौंडकरांचे प्रेमळ स्वागत स्वीकारल्यानंतर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी यवतच्या दिशेने मार्गस्थ झाला. भक्ती, शिस्त आणि सेवाभावाचा संगम अनुभवत हजारो वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत राहिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु