विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड नको; अतिवृष्टीग्रस्त शाळेची महापौर लांडगे यांची पाहणी
पुणे, 12 जुलै (हिं.स.)। मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या क्रांतिवीर चाफेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् आणि क्रांतिवीर चाफेकर प्राथमिक विद्यामंदिराची महापौर रवि लांडगे यांनी रविवारी प्रत्यक्ष पाहणी केली. यावे
Ravi landge mayar


पुणे, 12 जुलै (हिं.स.)। मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या क्रांतिवीर चाफेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् आणि क्रांतिवीर चाफेकर प्राथमिक विद्यामंदिराची महापौर रवि लांडगे यांनी रविवारी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होणार नाही, असे स्पष्ट करत आवश्यक दुरुस्ती व कायमस्वरूपी उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पाहणीदरम्यान महापौरांनी शैक्षणिक इमारतीचा परिसर, पावसाच्या पाण्यामुळे बाधित झालेली ठिकाणे, पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था, संरक्षक भिंतीलगतचा परिसर तसेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वावराच्या जागांची पाहणी केली. भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी तात्पुरत्या दुरुस्तीऐवजी तांत्रिक तपासणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी ड्रेनेज आणि स्टॉर्म वॉटर व्यवस्थेची तातडीने तपासणी करावी, नुकसान झालेल्या इमारतीच्या भागांची सक्षम तांत्रिक अधिकाऱ्यांकडून तपासणी करावी तसेच धोकादायक ठिकाणे सुरक्षित करून विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचनाही महापौरांनी प्रशासनाला केल्या.

याशिवाय संबंधित क्षेत्रीय कार्यालयाने संस्थेच्या प्रतिनिधींशी समन्वय साधून नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार करावा, आवश्यक कामांना प्राधान्य देऊन विलंब न करता अंमलबजावणी सुरू करावी आणि झालेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा अत्यंत संवेदनशील आणि सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या अडचणींचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर किंवा त्यांच्या सुरक्षिततेवर कोणताही परिणाम होऊ नये, याची प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी. आवश्यक तांत्रिक उपाययोजना दर्जेदार आणि तातडीने पूर्ण करण्यात याव्यात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande