मोशी दुर्घटनेनंतर आयुक्तांचे मोठे पाऊल; पर्यावरण विभाग आणि अँटोनी लारा कंपनीला नोटीसचे आदेश
पुणे, 12 जुलै (हिं.स.)। मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून, महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि ''वेस्ट टू एनर्जी'' प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या अँटोनी लारा रिन्युएबल या ठेकेदार कंपनीला नोट
Moshi


पुणे, 12 जुलै (हिं.स.)।

मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून, महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या अँटोनी लारा रिन्युएबल या ठेकेदार कंपनीला नोटीस बजावण्याचे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

रविवारी (१२ जुलै) आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सहआयुक्त मनोज लोणकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

८ जुलै रोजी मोशी येथील कचरा डेपोमध्ये दुपारी सुमारे दीडच्या सुमारास कचऱ्याचा मोठा ढिगारा 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली होती. या घटनेवेळी इमारतीत २२ तर बाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ एक अशा एकूण २३ जणांचा अडकल्याची नोंद आहे.

दुर्घटनेनंतर भारतीय सेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे बचावकार्य हाती घेतले. या मोहिमेत पाच जणांनी स्वतःची सुटका केली, तर बचाव पथकाने नऊ जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळवले. मात्र, या दुर्घटनेत नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले असून, आता चौकशी प्रक्रियेचा भाग म्हणून महापालिकेच्या पर्यावरण विभागासह संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस बजावण्याचे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. दुर्घटनेस कारणीभूत ठरलेल्या बाबींची तपासणी करून आवश्यक ती पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande