
पुणे, 12 जुलै (हिं.स.)।
मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ नागरिकांच्या नातेवाईकांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मदत तातडीने वितरित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
रविवारी (१२ जुलै) मोशी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आयोजित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी हा निर्णय जाहीर केला. बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सहआयुक्त मनोज लोणकर तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
८ जुलै रोजी दुपारी मोशी कचरा डेपो परिसरातील 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली होती. दुर्घटनेनंतर एनडीआरएफ, भारतीय सेना, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस आणि अन्य यंत्रणांनी संयुक्तपणे बचावकार्य हाती घेतले. घटनेनंतर पाच जणांनी स्वतःची सुटका केली, तर अडकलेल्या १८ जणांपैकी नऊ जणांना बचाव पथकाने जिवंत बाहेर काढले. मात्र, या दुर्घटनेत नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या दुर्घटनेत भावेश वाणी (३३), अक्षय सावंत (३५), सुनील कोरके (४०), सन्नी माने (३९), महेश कुंभार (३३), नागेश गायकवाड (२६), रणजीत पाटील (२२), राहुल गायकवाड (२३) आणि वामन कसबे (५०) यांचा मृत्यू झाला.
मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी महापालिकेकडून प्रत्येकी १० लाख रुपयांचा मदतनिधी देण्यात येणार असून, त्यासाठी कोणताही विलंब न करता आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु