
रत्नागिरी, 12 जुलै (हिं.स.) । येथील नानल गुरुकुल आणि संजीवन गुरुकुलमधील विद्यार्थ्यांनी भातलावणीतून पर्यावरणाशी नाते जोडणारा उपक्रम राबविला.
रा. भा. शिर्के प्रशालेच्या ॲड .बाबासाहेब नानल गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी नाचणे-गुरुमळी येथे भातलावणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व कळावे आणि पारंपरिक शेतीची जवळून ओळख व्हावी, या उद्देशाने आयोजित केलेल्या या उपक्रमात गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी थेट चिखलात उतरून भातलावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यांना सुदेश निवळकर, श्रेयस फटकरे, प्रियांका नाखरेकर या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी भाताची रोपे काढली आणि नंतर लावणी केली. या उपक्रमाचे कौतुक करताना शेतकरी राजू सावंत म्हणाले की, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात नवीन पिढीला शेती आणि मातीशी जोडणारा हा पुढाकार अत्यंत स्तुत्य आहे. त्यामुळे मुलांमध्ये कष्टाची जाणीव आणि अन्नाबद्दल आदर निर्माण होईल.
पटवर्धन हायस्कूलच्या कै. रा. पु. जोग संजीवन गुरुकुलातील पाचवीच्या विद्यार्थ्यांनीही गुरुकुलमधील पालक श्री. आंब्रे यांच्या चांदेराई येथील मळ्यात भातलावणीचा आनंद लुटला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शेतीचे महत्त्व व अन्नधान्य निर्मितीची प्रत्यक्ष माहिती मिळाली. निसर्ग, माती, पाणी आणि पर्यावरण संवर्धनाविषयी संवेदनशीलता वाढीस लागण्यात मदत झाली. भातलावणी हा केवळ शेतीचा टप्पा नसून, श्रमसंस्कार, निसर्गप्रेम आणि सामूहिक कार्याची शिकवण देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम संजीवन गुरुकुलात दरवर्षी साजरा होतो. प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळाल्याने शिक्षण अधिक आनंददायी व परिणामकारक झाले. मल्हार रजपूत याने संजीवन गुरुकुलतर्फे श्री. आंब्रे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. प्रबंधक मनाली नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पाचवीच्या वर्गशिक्षिका वीणा पाखरे आणि हर्षदा मालंडकर यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबविला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी