पुणे - उरुळी कांचनमध्ये पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात विसावला
पुणे, 12 जुलै (हिं.स.)। ज्ञानोबा माऊली तुकारामच्या अखंड जयघोषात आणि संत तुकाराम महाराजांच्या अभंगांनी भारावलेल्या वातावरणात लाखो वारकऱ्यांसह संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा रविवारी दुपारी सुमारे एक वाजता उरुळी कांचन येथे दुपारच्या विसाव्यासाठी
wari


पुणे, 12 जुलै (हिं.स.)। ज्ञानोबा माऊली तुकारामच्या अखंड जयघोषात आणि संत तुकाराम महाराजांच्या अभंगांनी भारावलेल्या वातावरणात लाखो वारकऱ्यांसह संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा रविवारी दुपारी सुमारे एक वाजता उरुळी कांचन येथे दुपारच्या विसाव्यासाठी दाखल झाला. भक्ती, सेवा आणि समर्पणाचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी उरुळी कांचनकरांनी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत केले.

लोणी काळभोर येथून सकाळी सुमारे सव्वा आठ वाजता पालखी सोहळ्याने प्रस्थान केले. थेऊर फाटा, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, इनामदार वस्ती, कोरेगाव मूळ आदी ठिकाणी ग्रामस्थांनी फुलांची उधळण, जलसेवा, अन्नदान तसेच वारकऱ्यांच्या प्रवासासाठी आवश्यक वस्तूंचे वाटप करून पालखीचे भावपूर्ण स्वागत केले.

पालखी सोहळा सुरळीत पार पडावा यासाठी महसूल, आरोग्य, ग्रामविकास, कृषी आणि पोलीस विभागांनी व्यापक नियोजन केले होते. संपूर्ण मार्गावर सुरक्षा, आरोग्य सेवा आणि वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष देण्यात आले होते.

महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक उरुळी कांचन नगरीत पालखीचा विसावा हा भक्तांसाठी अविस्मरणीय ठरला. श्री विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या हजारो वैष्णवांनी अभंग, हरिनाम आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरण निर्माण केले.

उरुळी कांचन येथील पुणे-सोलापूर महामार्गालगत ग्रामविकास सहकारी सोसायटीच्या भव्य पटांगणात ग्रामविकास विभागाच्या वतीने पालखीच्या विसाव्यासाठी वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला होता. येथे भाविकांसाठी दर्शन व्यवस्था, हिरकणी (स्तनपान) कक्ष, आरोग्य सेवा, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मोबाईल चार्जिंग सुविधा तसेच इतर आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

ग्रामपंचायतीचे प्रशासक मिलिंद जगताप आणि ग्रामपंचायत अधिकारी टी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीने स्वच्छता आणि वारकऱ्यांच्या सुविधांसाठी विशेष व्यवस्था केली होती.

पालखीच्या स्वागतासाठी आमदार माऊली कटके, माजी आमदार अशोक पवार, पुणे बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, संचालक राजाराम कांचन, अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते, महादेव कांचन, संतोष कांचन, संजय कांचन, राजेंद्र कांचन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

याच ठिकाणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेत वारकऱ्यांना आषाढी वारीच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, कुंजीरवाडी येथे हरीश गोठे, सचिन तुपे, संदीप धुमाळ यांनी, नायगाव फाट्यावर कृषीराज चौधरी, दिलीप वाल्हेकर आणि पुनम चौधरी यांनी, तर सोरतापवाडी येथे सुदर्शन चौधरी, अमित चौधरी, राजेंद्र चौधरी, विजय चौधरी आणि विलास चौधरी यांनी पालखीचे स्वागत केले. प्रयागधाम फाट्यावर मंगेश कानकाटे, भानुदास जेधे आणि नानासाहेब शिंदे यांनीही भाविकांसह उत्स्फूर्त स्वागत केले.

दुपारी साडेतीनच्या सुमारास उरुळी कांचन येथील विसावा आटोपून पालखी सोहळा यवत मुक्कामासाठी मार्गस्थ झाला. त्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास हवेली तालुक्याची सीमा ओलांडून पालखीने दौंड तालुक्यातील बोरीभडक येथे प्रवेश केला. भक्ती, शिस्त आणि सेवाभावाने नटलेला हा सोहळा पुढील मुक्कामाच्या दिशेने मार्गक्रमण करू लागला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande