
पुणे, 12 जुलै (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'कॅच द रेन' अभियानाला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील नागरिकांना जलसंवर्धनासाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. पावसाचे पाणी जिथे पडते, तिथेच त्याचे संवर्धन करा या संदेशाच्या अनुषंगाने यंदाच्या पावसाळ्यात पावसाचा प्रत्येक थेंब जतन करून भविष्यातील जलसुरक्षा मजबूत करण्यावर महापालिकेने भर दिला आहे.
'जिथे पाऊस पडतो, तिथेच पाणी साठवूया' या संकल्पनेवर आधारित या अभियानाअंतर्गत पर्जन्यजल संधारण, भूजल पुनर्भरण आणि शाश्वत जलव्यवस्थापनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. यासाठी घरे, गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालये, शासकीय व खासगी कार्यालये तसेच सार्वजनिक इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रणाली प्रभावीपणे कार्यान्वित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यासोबतच पाण्याचा काटकसरीने वापर, विहिरी, तलाव, नाले आणि इतर जलस्रोतांची स्वच्छता व पुनर्भरण तसेच 'पाणी अडवा, पाणी जिरवा' या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यावरही भर देण्यात येणार आहे.
महापालिकेच्या वतीने शहरभर जनजागृती अभियान, जलस्रोतांचे संवर्धन, रेनवॉटर हार्वेस्टिंगला प्रोत्साहन आणि नागरिकांच्या सहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून भावी पिढ्यांसाठी जपण्याची सामूहिक जबाबदारी आहे. पावसाचे पाणी ज्या ठिकाणी पडते, त्याच ठिकाणी साठविणे आणि जमिनीत मुरविणे ही काळाची गरज आहे. 'कॅच द रेन' ही केवळ सरकारी मोहीम नसून लोकसहभागातून यशस्वी होणारी जनचळवळ आहे. प्रत्येक नागरिक, संस्था आणि गृहनिर्माण सोसायटीने जलसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारल्यास पाणीटंचाईवर प्रभावी मात करता येईल आणि जलसुरक्षित पिंपरी-चिंचवड घडविता येईल.
मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनीही नागरिकांना आवाहन करत सांगितले की, पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता ते जमिनीत मुरविणे आणि साठविणे ही आजची अत्यावश्यक गरज आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रणाली प्रभावीपणे कार्यान्वित करणे, विद्यमान जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि पर्जन्यजल पुनर्भरणाच्या उपाययोजनांमध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु