पुणेकरांना दिलासा; पाणीकपात पुढील आदेशापर्यंत स्थगित
पुणे, 12 जुलै, (हिं.स.)। पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे, पालखी सोहळ्यानिमित्त तात्पुरती रद्द करण्यात आलेली पाणीकपात आता पुढील आदेशापर्यंत लागू न करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे सोमवार पासूनही शहरात जुन्या वेळापत्रकानुसार
water


पुणे, 12 जुलै, (हिं.स.)। पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे, पालखी सोहळ्यानिमित्त तात्पुरती रद्द करण्यात आलेली पाणीकपात आता पुढील आदेशापर्यंत लागू न करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे सोमवार पासूनही शहरात जुन्या वेळापत्रकानुसार पाणीकपात न करता नियमित पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे.गेल्या पाच ते सहा दिवसांत खडकवासला धरण साखळीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहराच्या पाणीपुरवठ्याची स्थिती सुधारल्याने महापालिका प्रशासनाने पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला नाही.

सध्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत १६.६४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात, विशेषतः ३ ते ६ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. अवघ्या तीन टीएमसीवर आलेला साठा काही दिवसांतच वाढून १६.६४ टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. यापूर्वी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे यांनी ७ ते १२ जुलै या कालावधीत पाणीकपात पूर्णपणे रद्द करून शहरात नियमित पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले होते. आता धरणांतील समाधानकारक जलसाठा लक्षात घेता हा निर्णय पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना पाणीकपातीपासून दिलासा मिळाला असून, सध्या नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande