
रत्नागिरी, 12 जुलै (हिं.स.) । जिल्ह्यात यंदाचा पावसाळा उशिरा सुरू झाला असला, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत पर्जन्यमानात लक्षणीय वाढ झाली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या १२ जुलै रोजीच्या पर्जन्यमान अहवालानुसार, १ जून ते १२ जुलै या कालावधीत जिल्ह्यात १,३२८.४९ मिमी सरासरी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १,१०४ मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे यंदा सुमारे २२ टक्क्यांनी अधिक पाऊस झाला आहे.
जिल्ह्याच्या वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत आतापर्यंत ३९.४६ टक्के पाऊस नोंदविण्यात आला आहे. आज सकाळी संपलेल्या २४ तासांमधील तालुकानिहाय आकडेवारीनुसार, गुहागर तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ४८.७३ टक्के पाऊस झाल्याने तो जिल्ह्यात आघाडीवर आहे. त्यानंतर खेड (४३.६४ टक्के), रत्नागिरी (४३.२९ टक्के) आणि मंडणगड (४२.७९ टक्के) या तालुक्यांचा क्रमांक लागतो. संगमेश्वर (३२.०२ टक्के) आणि राजापूर (३४.७४ टक्के) या तालुक्यांत तुलनेने कमी पर्जन्याची नोंद झाली आहे.
यंदा सर्वाधिक एकूण पाऊस मंडणगड तालुक्यात १,६५८.५० मिमी झाला असून, त्यापाठोपाठ खेड (१,५३४.१० मिमी) आणि दापोली (१,४५०.५० मिमी) या तालुक्यांचा क्रमांक आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण वाढल्याने धरणांतील जलसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली असून, खरीप हंगामासाठीही ही परिस्थिती अनुकूल मानली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी