
पुणे, 12 जुलै (हिं.स.)। विधिमंडळाच्या अधिवेशनात विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कथित करचुकवेगिरी प्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) कडून नोटीस मिळाल्यानंतर आता बारामती ॲग्रोच्या साखर कारखान्याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे येथील बारामती ॲग्रोच्या साखर कारखान्यावर हवा व जलप्रदूषणासह पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या संदर्भात कारखान्याला सात दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, मंडळाची वैध संमती मिळेपर्यंत कारखाना चालवू नये, असेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.शेटफळगडे येथील सागर वाबळे आणि छगन वाबळे या ग्रामस्थांनी कारखान्यामुळे परिसरात प्रदूषण होत असल्याची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. या तक्रारीनंतर मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ३ जुलै रोजी कारखान्याची पाहणी केली.
तपासणीदरम्यान कारखान्यात पर्यावरणीय नियमांचे पालन करण्यात त्रुटी आढळल्याचा दावा मंडळाने केला आहे. हवा आणि जलप्रदूषण नियंत्रणासंदर्भातील अटींचे पालन न झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष नोंदवत कारखान्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
दरम्यान, यापूर्वीही बारामती ॲग्रो आणि कथित करचुकवेगिरी प्रकरणी ईडीने रोहित पवार यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर आता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईमुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. बारामती ॲग्रोकडून या नोटिशीवर अधिकृत भूमिका समोर येणे अद्याप बाकी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु