मोशी दुर्घटनेवरून सुषमा अंधारेंचा सरकारला इशारा; गुन्हे दाखल करा, अन्यथा न्यायालयात जाऊ
पुणे, 12 जुलै (हिं.स.)। मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी केवळ चौकशीची घोषणा करून जबाबदारी झटकू नये, तर संबंधित महापालिका अधिकारी आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प राबविणाऱ्या अँटनी लारा कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना (उ
fgdf


पुणे, 12 जुलै (हिं.स.)। मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी केवळ चौकशीची घोषणा करून जबाबदारी झटकू नये, तर संबंधित महापालिका अधिकारी आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प राबविणाऱ्या अँटनी लारा कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागण्याबरोबरच रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

रविवारी चिंचवड येथे पत्रकार परिषदेत बोलताना अंधारे यांनी मोशी दुर्घटनेत मृत आणि जखमी कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर प्रशासनावर जोरदार टीका केली. यावेळी शहरप्रमुख चेतन पवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

अंधारे म्हणाल्या की, मोशी येथील दुर्घटना ही नैसर्गिक नसून पूर्णपणे मानवनिर्मित आहे. अशा गंभीर घटनेनंतर महापालिका आयुक्तांनी अधिकृत माहिती देणे अपेक्षित होते. घटनास्थळी किती जण होते, किती जणांना बाहेर काढण्यात आले, किती जखमी झाले आणि इमारतीची कायदेशीर स्थिती काय होती, याबाबत प्रशासनाने कोणतीही स्पष्ट माहिती दिली नाही. आयुक्तांनी या प्रकरणात जबाबदारी टाळल्याचा आरोपही त्यांनी केला.

मोशी येथील इमारतीला केवळ तळमजल्याचे पूर्णत्व प्रमाणपत्र (Completion Certificate) असताना त्यावर विनापरवाना आणखी दोन मजले बांधण्यात आल्याचा दावा करत त्यांनी बांधकामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पर्यावरण दिनी (५ जून) प्रकल्पाची चिमणी कोसळली होती, तसेच परिसरातील ब्लास्टिंगमुळे कचऱ्याचा ढिगारा कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन संरक्षक भिंत उभारणे आवश्यक होते, असेही त्यांनी नमूद केले. मिथेन वायूच्या धोक्याबाबतही योग्य उपाययोजना करण्यात आल्या का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बचावकार्याबाबतही त्यांनी प्रशासनावर टीका केली. पुरेशी यंत्रसामग्री वेळेवर उपलब्ध न झाल्याने बचावकार्यात विलंब झाला आणि त्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच या प्रकरणात महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा दावा करत प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या उपउत्पादनांच्या व्यवहाराची माहितीही सार्वजनिक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

या दुर्घटनेची अद्याप पोलिसांत योग्य नोंद झालेली नसल्याचा आरोप करत, मृतांच्या नातेवाईकांवर तक्रार दाखल करण्याची जबाबदारी ढकलण्याऐवजी महापालिका प्रशासनाने स्वतः पुढाकार घ्यायला हवा होता, असे अंधारे म्हणाल्या. या घटनेदरम्यान लोकप्रतिनिधीही अनुपस्थित राहिल्याची टीका त्यांनी केली. अँटनी लारा कंपनीने मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली असली, तरी ती पुरेशी नसून जबाबदारांवर फौजदारी कारवाई होणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिका आयुक्त, प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णी आणि संबंधित कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून न्यायालयीन लढा देणार असल्याचे सांगत, हा लढा सभागृहात, रस्त्यावर आणि न्यायालयातही सुरू राहील, असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande