शिव्या आणि नशामुक्त शाळांची मोहीम हाती घ्यावी - सीईओ वैदेही रानडे
रत्नागिरी, 13 जुलै (हिं.स.) । विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी आणि त्यांच्यात चांगल्या वर्तनाची सवय लावण्यासाठी आता ''शिव्यामुक्त शाळा'' आणि ''नशामुक्त शाळा'' हे मोहीम हाती घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य का
जिल्हा परिषद आदर्श शाळा आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभ


रत्नागिरी, 13 जुलै (हिं.स.) । विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी आणि त्यांच्यात चांगल्या वर्तनाची सवय लावण्यासाठी आता 'शिव्यामुक्त शाळा' आणि 'नशामुक्त शाळा' हे मोहीम हाती घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने आदर्श शिक्षक पुरस्कार (२०२५-२६) आणि आदर्श शाळा पुरस्कार (२०२४-२५ व २०२५-२६) या पुरस्कारांचा वितरण सोहळा येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात आज झाला. पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या समारंभात वैदेही रानडे बोलत होत्या. जिल्ह्यातील १०० टक्के शाळा 'निपुण शाळा' घोषित करण्याचे आपले ध्येय आहे. पटसंख्येअभावी एकही शाळा बंद पडणार नाही, याची काळजी शिक्षकांनी घ्यावी, असे आवाहनही रानडे यांनी केले.

पुढच्या वर्षी शाळांची पटसंख्या किती वाढेल, गावागावात किती आदर्श शाळा निर्माण होतील आणि त्यामधून आदर्श विद्यार्थी घडवून डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे स्वप्न कसे साकार होईल, याची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांनी घ्यावी, अशी अपेक्षा पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, जिल्ह्याला भारतरत्न पां. वा. काणे आणि साने गुरुजींसारख्या महान विभूतींचा वारसा लाभला आहे. साने गुरुजींच्या आईने दिलेला ‘हृदयाला आणि मनाला मळ लागणार नाही’ हा विचार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवताना प्रत्यक्ष राबवला पाहिजे. शिक्षकांनी संघर्षापेक्षा संवादातून प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा. ग्रामीण भागातही दामले विद्यालयासारख्या दर्जेदार शाळा निर्माण व्हाव्यात आणि पुढील वर्षी जिल्ह्यातील किमान ३० हजार विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसतील, हे उद्दिष्ट शिक्षकांनी प्रामाणिकपणे पूर्ण करावे.

जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष श्री. चाळके व शिक्षण सभापती श्री. मुरकर यांनीही यावेळी आपले विचार मांडले.

या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, उपाध्यक्ष विलास चाळके, कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर, समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे, महिला व बालविकास सभापती मयूरी शिर्के, शिक्षण व अर्थ सभापती नंदकुमार मुरकर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती आणि शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande