
रत्नागिरी, 13 जुलै (हिं.स.) । राजापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने १९ कोटी रुपयांचा विशेष विकास निधी मंजूर केला आहे. गेल्या १० जुलै २०२६ रोजी शासनाने यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला.
या मंजूर निधीतून नगरपरिषदेची नवीन प्रशासकीय इमारत, बहुउद्देशीय सभागृह, आधुनिक मच्छी व मटण मार्केट, शाळांची दुरुस्ती व सुशोभीकरण तसेच जलशुद्धीकरण केंद्र आणि पाणीपुरवठा योजनेची कामे हाती घेतली जाणार आहेत. मंजूर कामांमध्ये नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी ५ कोटी रुपये, बहुउद्देशीय सभागृहासाठी ३ कोटी रुपये, आधुनिक मच्छी व मटन मार्केटसाठी २.५ कोटी रुपये, शाळांच्या दुरुस्ती व उद्यान विकासासाठी ३ कोटी रुपये आणि जलशुद्धीकरण केंद्र व पाणीपुरवठा योजनेसाठी ५.५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पालकमंत्री उदय सामंत आणि राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला राजापूरला हा निधी मंजूर झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी