त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांचा ७३० वा समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात
त्र्यंबकेश्वर, 13 जुलै (हिं.स.) : संत निवृत्तीनाथ महाराजांचा ७३० वा समाधी सोहळा रविवारी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ मंदिरात अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो वारकरी, भावि
त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांचा ७३० वा समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात


त्र्यंबकेश्वर, 13 जुलै (हिं.स.) : संत निवृत्तीनाथ महाराजांचा ७३० वा समाधी सोहळा रविवारी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ मंदिरात अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो वारकरी, भाविक आणि भक्तांनी समाधीचे दर्शन घेतले.

भागवत एकादशी आणि समाधी सोहळ्याच्या निमित्ताने शनिवारी व रविवारी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषाने, टाळ-मृदुंगाच्या निनादाने आणि अभंगगायनाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. दर्शनासाठी वारकरी भक्तांनी दिवसभर रांगा लावल्या होत्या.

यंदा संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूर वारीसाठी मार्गस्थ झाली असून, सध्या ती अहिल्यानगर येथे मुक्कामी आहे. त्यामुळे तेथेही समाधी सोहळा भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

समाधी सोहळ्यादरम्यान संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीची विधिवत महापूजा करण्यात आली. पूजन, अभंग, हरिनामाचा गजर आणि टाळ-मृदुंगाच्या निनादात सोहळा संपन्न झाला. यानंतर उपस्थित भाविकांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. अनेक वारकरी भक्तिभावाने समाधीस्थळी नतमस्तक झाले.

समाधी पूजेचे पौरोहित्य योगेश गोसावी यांनी केले. यावेळी सचिव श्रीपाद कुलकर्णी, विश्वस्त मनोज राठी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. सोहळ्यानिमित्त सच्चिदानंद गोसावी यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या प्रभावी कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. -------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande