
जळगाव,, 13 जुलै (हिं.स.) महाराष्ट्रात कचरा व्यवस्थापन हे केवळ स्वच्छतेचे काम राहिलेले नसून वेगाने वाढणारे ‘हरित उद्योग’ (Green Business) क्षेत्र बनले आहे. वाढते शहरीकरण आणि पर्यावरण नियमांमुळे या क्षेत्रात व्यवसायाच्या अभूतपूर्व संधी निर्माण झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘अमृत’ (AMRUT) आणि ‘कुशाग्र इनोव्हेशन्स फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अमृत-सक्षम’ हा विशेष उद्योजकता विकास उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविला जात आहे.
रोजच्या कचऱ्यातून नियमित उत्पन्न आणि शाश्वत व्यवसाय उभा राहू शकतो. सुकलेल्या फुलांपासून अगरबत्ती आणि धूप बनविणे, प्लास्टिक, कागद आणि काच रिसायकलिंग करणे तसेच ‘रिसोर्स रिकव्हरी सेंटर’ (RRR) सुरू करणे अशा व्यवसायांच्या संधी उपलब्ध आहेत. योग्य तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक मार्गदर्शन आणि बाजारपेठेची जोड मिळाल्यास या क्षेत्रात स्वतःचा यशस्वी ब्रँड निर्माण करता येऊ शकतो. या क्षेत्रातील कोणत्याही पूर्वानुभवाची आवश्यकता नाही. स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणारे युवक-युवती, महिला बचत गट, विद्यमान व्यवसायाचा विस्तार करू इच्छिणारे व्यावसायिक, निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी, सामाजिक संस्था व पर्यावरणप्रेमी नागरिक या उपक्रमात अर्ज करू शकतात. अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवारांना अमृत संस्थेमार्फत विविध योजनांचे लाभ मिळू शकतात. इच्छुकांनी अमृत-सक्षम नोंदणी संकेतस्थळ (https://reference-url-citation.invalid/0) येथे अर्ज भरावा किंवा अमृत संस्थेचे संकेतस्थळ (https://reference-url-citation.invalid/1) येथे जाऊन नोंदणी करावी. इतर तपशील आणि माहितीसाठी अमृत संस्थेच्या प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा व्यवस्थापक यांच्या कार्यालयाला भेट द्यावी किंवा जिल्हा व्यवस्थापकांशी संपर्क साधावा.
त्यांचे संपर्क क्रमांक व पत्ता अमृत संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर ‘अमृत-सक्षम’ टीम दूरध्वनीद्वारे संपर्क साधेल. पात्र उमेदवारांना त्यांच्या जिल्ह्यातील कार्यशाळेची तारीख, वेळ आणि पुढील प्रक्रियेची माहिती दिली जाईल. या व्यवसायासंदर्भात प्राथमिक माहिती मिळण्यासाठी १६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता AMRUT युट्यूब चॅनेल (https://reference-url-citation.invalid/2) येथे प्रसारित होणाऱ्या लाईव्ह सत्रात सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी ७७५७०९१८५९ या क्रमांकावर संपर्क साधावा. ‘अमृत-सक्षम..! सक्षम उद्योजक..! स्वावलंबी महाराष्ट्र..! शाश्वत भविष्य..!’ तसेच ‘संधीची वाट पाहू नका, संधी निर्माण करा..! आजच या हरित क्रांतीचा भाग व्हा..!’ असे आवाहन अमृत संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर