
रत्नागिरी, 13 जुलै (हिं.स.) । महिला मोर्चाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि कार्यकर्त्रीने जनतेशी सातत्याने संपर्क ठेवत शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सक्रियपणे कार्य करावे, असे आवाहन रत्नागिरी दक्षिण जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांनी केले.
महिला मोर्चा जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज मोठ्या उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव उपस्थित होते. यावेळी महिला मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि विविध मंडळांतील महिला प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
बैठकीत संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. आगामी काळातील पक्षाचे कार्यक्रम, महिला सक्षमीकरण, बूथ सक्षमीकरण, जनसंपर्क अभियान तसेच पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील विविध प्रश्न, सूचना आणि संघटनात्मक बाबी मांडल्या. सर्वांचे म्हणणे सौ. वर्षा परशुराम ढेकणे आणि जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतले. तसेच त्यावर योग्य मार्गदर्शन करून आवश्यक सूचना दिल्या.
बैठकीमुळे महिला मोर्चाच्या कार्याला नवी दिशा मिळाली असून आगामी काळात अधिक जोमाने संघटन वाढविण्याचा निर्धार उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. बैठकीमध्ये जिल्हा सरचिटणीस नपुराताई मुळे, श्रुती ताम्हणकर, उपाध्यक्ष संगीता कवितके, स्नेहा चव्हाण, रूपाली कदम, शीतल रानडे, मंडळ अध्यक्ष सुचिता नाचणकर, शहराध्यक्ष भक्ती दळी सुयोग जठार, ध्रुवी लाकडे, सुप्रिया बेंद्रे, वैदही बने, आदिती गुडेकर, रावी मोरे इत्यादी महिला उपस्थित होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी