बाधित शेतकऱ्यांना तातडीने बियाणे द्या- बच्चू कडू
अमरावती, 13 जुलै (हिं.स.) : जिल्ह्यात बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून बाधित शेतकऱ्यांना पुढील पाच
बोगस बियाण्यांवरून बच्चू कडू संतापले; 'पाच दिवसांत बियाणे द्या, अन्यथा कंपनीचे कार्यालय जाळू' – कृषी आयुक्तांना फोनवरून इशारा


अमरावती, 13 जुलै (हिं.स.) : जिल्ह्यात बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून बाधित शेतकऱ्यांना पुढील पाच ते सहा दिवसांत दुबार पेरणीसाठी तातडीने बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

बोगस बियाण्यांमुळे हजारो शेतकरी अडचणीत सापडले असून सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. बोगस बियाण्यांमुळे हजारो शेतकरी संकटात आले आहेत. सरकारची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे. सरकार झोपले आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बाधित शेतकऱ्यांना वेळेत बियाणे उपलब्ध झाले नाही तर येत्या १८ किंवा १९ तारखेला संबंधित बूस्टर कंपनीच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

बोगस बियाणे पुरवणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करताना कडू म्हणाले की, कोणत्याही कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे धाडस करू नये. बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई तसेच दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

या प्रकरणामुळे अमरावती जिल्ह्यातील बोगस बियाण्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

-----------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande