चंद्रपूर : डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळा : मनपा
चंद्रपूर, 13 जुलै (हिं.स.) : मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता लक्षात घेता डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. डेंग्यू डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रत्येकाने
चंद्रपूर : डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळा : मनपा


चंद्रपूर, 13 जुलै (हिं.स.) : मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता लक्षात घेता डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. डेंग्यू डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रत्येकाने आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळावा, असे आवाहन मनपाने केले आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे घर व परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.

डेंग्यू रोगास कारणीभूत असलेला एडीस मादी डास जमिनीपासून सुमारे १०० मीटरपर्यंत उडू शकतो. हा डास स्वच्छ पाण्यात तसेच काही दिवस साठून राहिलेल्या पाण्यात वाढतो. त्यामुळे नागरिकांनी आठवड्यातून किमान एकदा पाण्याची भांडी रिकामी करून ती घासून-पुसून स्वच्छ करावीत तसेच पाणी साठविणारी भांडी घट्ट झाकून ठेवावीत.

डेंग्यूमुळे ताप, अंगावर पुरळ येणे, डोळ्यांच्या खोबणीमध्ये दुखणे, पाठदुखी, डोकेदुखी, स्नायू व सांध्यांमध्ये वेदना अशी लक्षणे दिसून येतात. डेंग्यू हा विषाणूजन्य आजार असून योग्य वेळी उपचार न मिळाल्यास तो गंभीर स्वरूप धारण करू शकतो. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.

डेंग्यू हा नोटीफायेबल आजार असल्याने कोणत्याही शासकीय अथवा खासगी डॉक्टरांना संशयित रुग्ण आढळल्यास त्याची माहिती महानगरपालिकेला देणे आवश्यक आहे.

नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळून घर व परिसरातील पाणी साठे नष्ट करावेत आणि डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी सहकार्य करावे. चंद्रपूर शहर डेंग्यूमुक्त करण्याच्या महानगरपालिकेच्या प्रयत्नांना नागरिकांनी साथ द्यावी, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande