
लातूर, 13 जुलै (हिं.स.)लातुरसह मराठवाड्यातील अनेक भागात शंखी गोगलगाय आणि पैसा आळीचा प्रादुर्भाव आतापासूनच दिसून येत असून ते कोवळे सोयाबीन फस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी सरकारकडे केली आहे.
महाराष्ट्रात काही भागात सतत पाऊस पडत असला तरी मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहेत. कमी पाऊस असतानाही अनेक शेतकऱ्यांनी पेरणीची जोखीम उचलली. लातुरमध्ये आजवर साधारण ३५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पावसाअभावी अनेकांना अद्याप पेरणी करता आली नाही. ज्या भागात पेरणी झाली त्या भागात शंखी गोगलगायीने डोके वर काढले आहे. या संदर्भात शेतकऱ्यांमधून आलेल्या तक्रारींची त्वरित दखल घेऊन माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.
मराठवाड्यातील बळीराजा आधीच आमचा पावसाच्या लहरीपणामुळे आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे प्रचंड चिंतेत आहे.. निसर्गाची साथ नसतानाही अनेक शेतकऱ्यांनी पदरचे पैसे लावून, कर्ज काढून पेरणीची मोठी जोखीम उचलली. त्यातच आता या नव्या अस्मानी संकटाने अनेक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात सध्या शंखी गोगलगाय आणि पैसा अळीचा भयंकर प्रादुर्भाव झाला आहे. ते कोवळे सोयाबीन आणि इतर पिके फस्त करत आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis