आरक्षण प्रश्नावर कर्जतमध्ये १४ जुलैला निर्णायक मोर्चा
रायगड, 13 जुलै (हिं.स.)। एकच आरक्षण पाहिजे, आरक्षणाचे विभाजन थांबवा आणि समान हक्क, सामाजिक न्याय या प्रमुख मागण्यांसाठी विविध आंबेडकरी, बौद्ध व बहुजन संघटनांच्या वतीने मंगळवार, १४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कर्जत येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्य
Decisive rally on the reservation issue in Karjat on July 14.


रायगड, 13 जुलै (हिं.स.)। एकच आरक्षण पाहिजे, आरक्षणाचे विभाजन थांबवा आणि समान हक्क, सामाजिक न्याय या प्रमुख मागण्यांसाठी विविध आंबेडकरी, बौद्ध व बहुजन संघटनांच्या वतीने मंगळवार, १४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कर्जत येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, आरक्षणाचे उपवर्गीकरण (सब-कॅटेगरी) रद्द करून एकसमान आरक्षण धोरण लागू करावे, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सर्वेक्षणाच्या आधारे न्याय्य वाटप करावे, तसेच आरक्षणावरील ५० टक्के मर्यादा हटवून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण लागू करावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय खासगी क्षेत्रातही आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक वसतिगृहे, शिष्यवृत्ती तसेच नोकरीत प्राधान्य देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून होणार असून, तेथून मुख्य बाजारपेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मार्गे प्रशासकीय भवन येथे मोर्चाचा समारोप होणार आहे. या मोर्चाद्वारे शासनाचे लक्ष आरक्षणासंदर्भातील मागण्यांकडे वेधण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

या आंदोलनाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय बौद्ध महासंघ, चर्मकार बहुजन महासंघ, आदिवासी कृती महासमिती, कर्जत तालुका वाल्मिकी समाज आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी संयुक्तपणे केले आहे.

मोर्चाच्या माध्यमातून सामाजिक न्याय, समान हक्क आणि आरक्षणाच्या प्रश्नावर समाजाने एकत्र येण्याचे आवाहन करत शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि जय भीम, जय संविधान या घोषणांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande