ज्ञानेश्वर वाकडे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
बीड, 13 जुलै (हिं.स.)।अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे शनिवारी रात्री झालेल्या ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे या तरुणाच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ सोमवारी घाटनांदूर आणि पट्टीवडगाव या दोन्ही गावांमध्ये स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आला. य
कडकडीत बंद


बीड, 13 जुलै (हिं.स.)।अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे शनिवारी रात्री झालेल्या ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे या तरुणाच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ सोमवारी घाटनांदूर आणि पट्टीवडगाव या दोन्ही गावांमध्ये स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आला. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी चार मुख्य आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असून इतर तीन आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, मृत ज्ञानेश्वर यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी त्यांच्या मूळ गावी पट्टीवडगाव येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शनिवारी रात्री झालेल्या या धक्कादायक हल्ल्याने संपूर्ण अंबाजोगाई तालुका हादरून गेला आहे. या क्रूर हत्येचा तीव्र निषेध करण्यासाठी घाटनांदूर आणि पट्टीवडगाव येथील ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सकाळपासूनच दोन्ही गावांमधील बाजारपेठा, दुकाने, हॉटेल्स आणि व्यापारी प्रतिष्ठाने पूर्णपणे बंद होती. केवळ वैद्यकीय सेवांसारख्या अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. व्यापारी आणि नागरिकांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवून या घटनेबाबत आपला तीव्र रोष व्यक्त केला. अनुचित प्रकार टाळण्यासाठी दोन्ही गावांमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिसरात प्रचंड तणावपूर्ण शांतता पसरली आहे.

मृत ज्ञानेश्वर हा मूळचा पट्टीवडगाव येथील रहिवासी असल्याने या घटनेचा सर्वाधिक धक्का त्याच्या कुटुंबाला आणि गावाला बसला आहे. सोमवारी सायंकाळी ज्ञानेश्वरचे पार्थिव पट्टीवडगाव येथे आणण्यात आले तेव्हा संपूर्ण गावाचा कंठ दाटून आला होता. त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी परिसरातील हजारो नागरिकांनी अंत्यसंस्काराच्या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. अत्यंत जड अंतःकरणाने आणि साश्रू नयनांनी ज्ञानेश्वरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी आणि संतापजनक घटनेमुळे दोन्ही गावांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण अंबाजोगाई तालुका या घटनेने सुन्न झाला आहे. या गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा पोलीस कसून शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.

---------------------------

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande