ओबीसी महामंडळाच्या विविध कर्ज व व्याज परतावा योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव, 13 जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय जळगाव तसेच महामंडळाच्या विविध उपकंपन्यांमार्फत इतर मागासवर्गीय नागरिकांच्या आर्थिक विकासासाठी विविध कर्ज व व्याज परतावा योजना राबविण्यात य
ओबीसी महामंडळाच्या विविध कर्ज व व्याज परतावा योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन


जळगाव, 13 जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय जळगाव तसेच महामंडळाच्या विविध उपकंपन्यांमार्फत इतर मागासवर्गीय नागरिकांच्या आर्थिक विकासासाठी विविध कर्ज व व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहेत. पात्र नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

महामंडळाच्या माध्यमातून इतर मागासवर्गीय समाजातील नागरिकांच्या कल्याण, विकास आणि आर्थिक उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये संत काशिबा गुरव आर्थिक विकास महामंडळ, जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ, संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ यांसह विविध समाजांसाठी स्थापन करण्यात आलेल्या उपकंपन्यांचा समावेश आहे.

सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी महामंडळाच्या मुंबई येथील मुख्यालयाकडून जळगाव जिल्ह्यासाठी भौतिक व आर्थिक उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, ही उद्दिष्टे १०० टक्के पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्हा कार्यालयामार्फत २० टक्के बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना (रु. १ लाखापर्यंत), वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (बँकेकडून रु. १५ लाखांपर्यंत), गट कर्ज व्याज परतावा योजना (रु. १० लाख ते कमाल रु. ५० लाखांपर्यंत), शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना (रु. १० लाख ते कमाल रु. २० लाखांपर्यंत), महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना आणि कौशल्य विकास योजना अशा सात योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

महामंडळाच्या सर्व योजना पूर्णतः ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असून, पात्र अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पहिला मजला, मायादेवी शनी मंदिराजवळ, जळगाव येथे संपर्क साधावा. तसेच दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२६१९१८ वर अधिक माहिती मिळू शकते.

ओबीसी समाजातील पात्र नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande