
नाशिक, 13 जुलै (हिं.स.)।
: विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता व कलागुणांना प्रोत्साहन देण्याबरोबरच जिल्हा परिषद शिक्षकांच्या कलात्मक प्रतिभेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने नाशिक जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. उत्कृष्ट चित्रांना फ्रेम करून जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत प्रदर्शित करण्यात येणार आहे.
शिक्षण विभागाने सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या असून, जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धा इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते दहावी आणि शिक्षक अशा तीन गटांत होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी निसर्गचित्र, वारली, मधुबनी, पर्यावरण, भारतीय सण-उत्सव, डिजिटल क्रांती आदी विषय, तर शिक्षकांसाठी लॅन्डस्केप, भारतीय संस्कृती, ऐतिहासिक व पौराणिक प्रसंग, अमूर्त कला, ग्लोबल वॉर्मिंग तसेच विद्यार्थी गटातील विषयांवर चित्र सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. विविध रंगमाध्यमांचा वापर करण्यास मुभा असून, निर्धारित आकाराच्या पेपर किंवा कॅनव्हासवर चित्रे सादर करावीत. सर्व शाळांनी चित्रे संबंधित गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे २५ जुलै २०२६ पर्यंत, तर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी ती २७ जुलै २०२६ पर्यंत जिल्हा परिषद, नाशिक येथे जमा करावीत. प्रत्येक चित्रामागे सहभागीचे नाव, शाळा, इयत्ता, तुकडी, तालुका व संपर्क क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे.
जिल्हास्तरावर तज्ज्ञांकडून चित्रांचे मूल्यमापन करून उत्कृष्ट कलाकृतींची निवड करण्यात येईल. निवड झालेल्या चित्रांना जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीत कायमस्वरूपी स्थान दिले जाणार असून, या उपक्रमातून विद्यार्थी व शिक्षकांच्या कलागुणांना व्यापक व्यासपीठ मिळेल.
साईलता सामलेटी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. नाशिक
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV