
यवतमाळ, 13 जुलै (हिं.स.)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना खेळात रुची निर्माण व्हावी, यासाठी समग्र शिक्षाकडून विविध प्रकारच्या क्रीडा साहित्याचे वाटप मार्च महिन्यात केल्याची माहिती प्राप्त झाली. परंतु, कोणत्या स्वरूपाचे साहित्य शाळानुसार कसे वाटप केले, याचा कुठलाही तपशील शिक्षण विभाग, समग्र शिक्षाकडे उपलब्ध नाही. यावरून खेळाचे साहित्य वाटपाचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे.
शिक्षणासोबतच खेळणेही अतिशय महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांना मैदानी खेळामध्ये आवड राहते. बर्!याचवेळा योग्य व्यासपीठ मिळत नाही. तर सोयी, सुविधांचा अभाव, क्रीडा साहित्य मिळत नसल्यामुळे होतकरू विद्यार्थी खेळापासून दूर राहतात. ग्रामीण भागातून उच्च दर्जाचे खेळाडू तयार व्हावे, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा शासनाचा मानस होता. परंतु, जिल्हा परिषदेच्या एकूण दोन हजार ९९ पैकी १९८ शाळेला स्वतंत्र मैदान नाहीत. तर उर्वरित एक हजार ९०१ शाळांच्या स्वतंत्र मैदानाची अवस्था खेळण्यायोग्य नाही. परिणामी, होतकरू खेळाडूंची परवड होत आहे. यावर कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नाहीत. असे असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना समग्र शिक्षाकडून खो-खोचा खांब, बॅट,बॉल, बॅटमिंटन, चेस, फुटबॉल, लेझीम, डंबेल्स, रस्सीखेचसाठी दोरी, टेबल टेनिस, कॅरम बोर्ड यासह इतरही खेळाचे साहित्य जिल्ह्याला उपलब्ध करून देण्यात आले होते. या साहित्याची परिपूर्ण माहिती समग्र शिक्षालासुद्धा नव्हती. फेब्रुवारी महिन्यात प्राप्त झालेल्या साहित्य वाटपाच्या दृष्टीने कुठल्याही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या नव्हत्या. मध्यंतरी प्राप्त सूचनेनंतर खेळाचे साहित्य शाळास्तरावर वितरित करण्यात आले आहे. परंतु, शाळानिहाय साहित्य वाटप कसे केले याची माहिती शिक्षण विभाग तसेच समग्र शिक्षाकडेसुद्धा उपलब्ध नाही. ही माहिती कधी घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मैदानासाठी पुढाकार घेणे आवश्यक
‘खेलो इंडिया’ अंतर्गत मुलांना खेळाकडे वळविणे तसेच क्रीडा संस्कृती वाढवणे हा शासन आणि प्रशासनाचा मुख्य उद्देश आहे. या उद्देशातूनच केंद्र आणि राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. असे असलेतरी क्रीडा मैदान नसल्यामुळे अनेक होतकरू खेळाडू वंचित राहत आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या कलागुणांना चालना मिळावी, याकरिता उच्च दर्जाचे मैदान शाळास्तरावर करणे आवश्यक आहे. आजघडीस जिल्ह्यातील १९८ शाळांकडे स्वतंत्र मैदान नाही हे विशेष.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी