
छत्रपती संभाजीनगर, 13 जुलै (हिं.स.)।
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले व संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विभागाच्या वतीने पाचशे स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे विद्यार्थी गावोगावी जाऊन या महापुरुषांच्या विचारांचा प्रचार, प्रसार करणार आहेत, अशी माहिती रासेयो विद्यापीठ संचालक डॉ.सोमीनाथ खाडे यांनी दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या संदर्भात सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली.व्यवस्थापन परिषद कक्षात आयोजित या बैठकीस प्रकुलगुरु डॉ. प्रविण वक्ते, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, प्र. वित्त व लेखाधिकारी डॉ/ संजय कवडे, राज्य संपर्क अधिकारी डॉ. मिलिंद काळे, विशेष कार्य अधिकारी, रासेयो कक्ष, अजय बा. शिंदे, संचालक डॉ.सोमीनाथ खाडे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत मंजूर करण्यात आलेले महत्वपूर्ण प्रस्ताव पुढीलप्रमाणे:
यावेळी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षामध्ये रक्तदान शिबिर महाविद्यालय व समाजातील विविध संस्था यांना एकत्र करुन समाजामध्ये रक्तदानविषयी जनजागृती व शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या पाच गावामध्ये जिल्हा नेतृत्व व उद्बोधन शिबिर आयोजित करण्याचा निर्णय झाला. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी कार्यशाळा जिल्हा निहाय आयोजन, दोन दिवसीय कार्यशाळा, संत गाडगेबाबा यांचे १५० जन्म शताब्दी, महात्मा फुले यांच्या द्विशतक जयंती निमित्त तसेच संत रविदास यांची ६५० जयंती मोहत्सवा निमित्त कार्यक्रम घेण्याचे ठरले. ५०० स्वंयसेवकांचे प्रशिक्षण व पाच हजार गावामध्ये संत गाडगेबाबा यांचा विचार घेऊन जाणार तसेच या वर्षी एक लक्ष वृक्ष रोपण व संवर्धन हे महाविद्यालयांनी दत्तक घेतलेल्या गावामध्ये वृक्षरोपन कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. विद्यापीठ दत्तक पाच गांवामध्ये सुसज्ज वाचनालय व अभ्यासिका समाजाच्या आधारावर व महाविद्यालयाच्या सहकार्याने सुरु करण्यात येतील, रासेयो व स्वयंसेवी संस्था यांच्या समवेत सामंज्यस्य करार करून स्वंयसेवक प्रशिक्षण, वृक्षरोपन व पर्यावरण संर्वधन इत्यादी उपक्रम राबविण्यात येतील. नाविन्य पुर्ण उपक्रम किचन गार्डन, सेद्रीय भाजीपाला व शेंद्रीय शेती याविषयी जागरण करणे व आपल्या दत्तक गांवामध्ये प्रत्यक्ष शेद्रीय भाजीपाला लावण्यासाठी प्रोत्साहन देणे, सविधान रॅली २६ नोव्हेंबर रोजी करुन सविधाना विषयी जागृत करणे, इत्यादी उपक्रम या शैक्षणिक वर्षामध्ये आयोजीत करण्याकरीता सल्लागार समितीने ठरावास मंजुरी दिली.
या बैठकीत मागील वर्षांचा आढावा घेण्यात आला या मध्ये महावृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. ज्यामध्ये ४५ हजार २५५ रोपण व संवर्धन करण्यात आले. तसेच कर्णपूरा यात्रा स्वच्छता अभियान, पुरग्रस्त भागातील शेतकरी मजूर यांना १८०० कुटुंबांना किराण किट मदत म्हणून देण्यात आली. तसेच पुरग्रस्त भागातील ८५५ शालेय विद्यार्थ्यांना बॅगसहीत सर्व साहित्याचे वाटप करण्यात आले. संविधान दिनानिमित्त पदयात्रा, रक्तदान शिबिरामध्ये स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले. वंदे मातरम् गीताचे सामूहिक गायन जागतिक विक्रमामध्ये सहभाग घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis