
ज्येष्ठ नागरिकांशी साधला संवाद; परिसर विकासासाठी सहकार्याचे आश्वासन
लातूर, 13 जुलै (हिं.स.) :उदगीर शहरातील शिवनगर, बिदर रोड येथील श्री ओंकारेश्वर महादेव मंदिराला माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी सदिच्छा भेट देऊन भगवान महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या आरोग्याची, सामाजिक प्रश्नांची तसेच परिसरातील विकासकामांची माहिती घेतली.
मंदिराच्या उभारणीसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात योगदान देणाऱ्या सर्व दानशूर व्यक्ती, भाविक आणि कार्यकर्त्यांचे आ. बनसोडे यांनी मनःपूर्वक आभार मानले. समाजातील एकोपा आणि श्रद्धेचे प्रतीक म्हणून उभे राहिलेले हे मंदिर परिसरातील नागरिकांसाठी प्रेरणास्थान ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आ. संजय बनसोडे म्हणाले की, धार्मिक स्थळांना भेट दिल्यानंतर मन प्रसन्न होते. भगवान महादेवाच्या दर्शनाने नवीन ऊर्जा, सकारात्मक विचार आणि समाजसेवेची प्रेरणा मिळते. अशा ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना त्यांच्या अनुभवातूनही खूप काही शिकायला मिळते.
उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी परिसरातील विविध समस्या, सामाजिक उपक्रम आणि मंदिराच्या विकासासंदर्भात आपली मते मांडली. आ. बनसोडे यांनी त्यांच्या सूचनांची दखल घेत विकासकामांसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या भेटीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी मंदिराचे पदाधिकारी, भाविक, शिवनगर परिसरातील नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis