
रायगड, 13 जुलै (हिं.स.)। : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग आणि श्री. डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त १५ जुलै २०२६ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा जास्तीत-जास्त बेरोजगार युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी सहायक आयुक्त श्रीकांत कोकाटे यांनी केले आहे.
पनवेल येथील श्री. डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर येथे होणाऱ्या या मेळाव्यात जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांमधील विविध रिक्त पदे व अप्रेंटिसशिपसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. एसएससी, एचएससी, आयटीआय, डिप्लोमा, अभियांत्रिकी, फार्मसी तसेच इतर पदवीधारक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी महा स्वयंम पोर्टलवर नोंदणी करून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार ऑनलाइन अर्ज करावा.
रोजगार मेळाव्यात विविध महामंडळांच्या कर्ज योजना, स्वयंरोजगाराच्या संधी तसेच मोफत कौशल्य प्रशिक्षणाबाबतही माहिती व मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे नोकरीसह स्वयंरोजगाराच्या संधी शोधणाऱ्या युवकांसाठी हा मेळावा उपयुक्त ठरणार आहे. ऑनलाइन अर्ज करताना अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)