शिरजगाव कसबा पोलिस कर्मचारी वसाहतीचा प्रस्ताव २० वर्षांपासून रखडला
अमरावती, १३ जुलै (हिं.स.) : अमरावती ग्रामीण पोलिस विभागांतर्गत येणाऱ्या संवेदनशील शिरजगाव कसबा पोलिस ठाण्यासाठी कर्मचारी वसाहतीची जागा उपलब्ध असूनही गेल्या दोन दशकांपासून बांधकाम न झाल्याने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवासी सुविधांपासून वंचित र
पोलिसांच्या वसाहतीचा मुहूर्त सापडेना


अमरावती, १३ जुलै (हिं.स.) : अमरावती ग्रामीण पोलिस विभागांतर्गत येणाऱ्या संवेदनशील शिरजगाव कसबा पोलिस ठाण्यासाठी कर्मचारी वसाहतीची जागा उपलब्ध असूनही गेल्या दोन दशकांपासून बांधकाम न झाल्याने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवासी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी अनेक कर्मचाऱ्यांना बाहेरगावाहून दररोज ये-जा करावी लागत असून, या प्रश्नाबाबत स्थानिक स्तरावर नाराजी व्यक्त होत आहे.

शिरजगाव कसबा पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात शिरजगाव कसबा, करजगाव, देऊरवाडा यांसह दहा गावे येतात. यापूर्वी करजगाव व शिरजगाव कसबा येथे दंगलीच्या घटना घडल्या असून, बहिरम यात्रा, देऊरवाडा येथील बालाजी उत्सव, लाखनवाडीतील संत गुणवंत महाराज जयंती-पुण्यतिथी महोत्सव तसेच कार्तिकी यात्रेदरम्यान लाखो भाविकांची उपस्थिती असते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने या पोलिस ठाण्याला विशेष महत्त्व आहे.

या पोलिस ठाण्यात एक सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय), तीन पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) आणि सुमारे ४० पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र त्यांच्यासाठी शासकीय निवासस्थाने उपलब्ध नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांना रोजचा प्रवास करावा लागत असल्याचे सांगितले जाते.

महसूल प्रशासनाने २००६ मध्ये ग्रामपंचायतीमार्फत पोलिस कर्मचारी वसाहतीसाठी सुमारे ११,४०० चौरस फूट क्षेत्रातील १४ भूखंड उपलब्ध करून दिले होते. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रस्तावही सादर करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र अद्याप बांधकामास मंजुरी मिळालेली नसल्याने ही जागा ओसाड पडली असून, सध्या तेथे बाभळी व काटेरी झाडांनी ताबा घेतला आहे. काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने या जागेवरील अतिक्रमण हटविण्यात आले होते.

दरम्यान, पोलिस ठाण्यालगत असलेले ठाणेदारांचे शासकीय निवासस्थानही जीर्ण अवस्थेत असून पावसाळ्यात छत गळत असल्याने ताडपत्री टाकून तात्पुरती व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहे.

यासंदर्भात माजी जिल्हा परिषद आरोग्य सभापती मनोहर सुने यांनी गृहमंत्रालयाने शिरजगाव कसबा पोलिस ठाण्यासाठी कर्मचारी वसाहत तसेच अधिकाऱ्यांची शासकीय निवासस्थाने उभारण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande