मेळघाटातील आर. आर. पाणी पुरवठा योजनेला ग्रहण
- परीसरातील तब्बल ४० गावातील नागरिक त्रस्त अमरावती, 13 जुलै (हिं.स.) धारणी तालुक्यातील दादरा परिसरात आर. आर. योजनेअंतर्गत सुरू असलेली पाणीपुरवठा योजना गेल्या चार वर्षांपासून रखडल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संब
मेळघाटातील आर. आर. पाणी पुरवठा योजनेला ग्रहण


- परीसरातील तब्बल ४० गावातील नागरिक त्रस्त

अमरावती, 13 जुलै (हिं.स.)

धारणी तालुक्यातील दादरा परिसरात आर. आर. योजनेअंतर्गत सुरू असलेली पाणीपुरवठा योजना गेल्या चार वर्षांपासून रखडल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित विभागाकडून या महत्त्वाकांक्षी योजनेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

प्राप्त माहीती नुसार या योजनेअंतर्गत हिराबंबई, दादरा, राणापिसा, भुलोरी, मान्सुधावडी, रबांग, खिडकी कलम, बारातांडा, सुसर्दा आदींसह सुमारे ४० गावांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या निधीतून पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू करण्यांत आली होती. मात्र अनेक ठिकाणी कामे अपूर्ण अवस्थेत पडून असून, गेल्या चार वर्षांत योजनेला गती मिळालेली नाही. त्यामुळे शासनाचा मोठा निधी निष्प्रभ ठरत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या योजनेचे तांत्रिक काम पाहणारे अभियंता अमरावती येथून कामकाज सांभाळत असल्याने प्रत्यक्ष देखरेख होत नाही. परिणामी कामांचा वेग मंदावला असून गेल्या काही काळापासूनयोजना पूर्णतः ठप्प पडली असून योजना पूर्णत्वास जात नाही.

या गंभीर प्रश्नाची वरिष्ठ प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी ठोस कार्यवाही करावी आणि नागरिकांना लवकरात लवकर शुद्ध पिण्याच्या पाण्याचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.

शासनाचा निधी व्यर्थ; जबाबदार कोण?

आर.आर. धारणी तालुक्यातील योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले मोठे फिल्टर प्लांट, उंच पाण्याच्या टाक्या, पाईपलाइन व इतर साहित्य योजना पूर्ण होण्यापूर्वीच निष्क्रिय अवस्थेत पडून असून अनेक ठिकाणी त्यांची झीज होऊन ते भंगारात निघण्याची वेळ आली आहे. कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी वापरूनही नागरिकांना पाणी मिळालेले नाही, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. संबंधित अभियंता अमरावती येथून कामकाज पाहत असल्याने प्रत्यक्ष देखरेखीचा अभाव असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande