मांजरांसाठी निर्बीजीकरण केंद्राला नाशिक मनपाची मंजुरी
नाशिक, 13 जुलै (हिं.स.)। नाशिक शहरासह जिल्ह्यात वाढत्या भटक्या मांजरांच्या समस्येवर उपाय म्हणून नाशिक महानगरपालिकेने मांजरांसाठी गौळाणे शिवारात स्वतंत्र निर्बीजीकरण (नसबंदी) केंद्राला अखेर मंजुरी दिली आहे. भूतदया फाउंडेशनच्या दोन वर्षांच्या सा
मांजरांसाठी निर्बीजीकरण केंद्राला नाशिक मनपाची मंजुरी


नाशिक, 13 जुलै (हिं.स.)।

नाशिक शहरासह जिल्ह्यात वाढत्या भटक्या मांजरांच्या समस्येवर उपाय म्हणून नाशिक महानगरपालिकेने मांजरांसाठी गौळाणे शिवारात स्वतंत्र निर्बीजीकरण (नसबंदी) केंद्राला अखेर मंजुरी दिली आहे. भूतदया फाउंडेशनच्या दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हा निर्णय प्रत्यक्षात आला आहे. त्याचे प्राणीप्रेमींकडून स्वागत करण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षांत शहरात भटक्या मांजरांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्यातून पिल्लांची संख्याही वाढत असून, अनेकदा ही पिल्ले रस्त्यावर, मोकळ्या जागांमध्ये किंवा इतर ठिकाणी सोडून दिली जातात. परिणामी उपासमार, आजार आणि वाहनांच्या धडकेत मृत्यू अशा गंभीर समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते. या परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून मांजरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र निर्बीजीकरण केंद्राची गरज व्यक्त केली जात होती.

भूतदया फाउंडेशनने 2024 मध्ये प्रथमच महानगरपालिकेकडे याबाबत अधिकृत निवेदन सादर केले होते. त्यानंतर फाउंडेशनचे अध्यक्ष ऋषिकेश भालेराव यांनी प्रशासनातील विविध अधिकार्यांशी सातत्याने पाठपुरावा करत या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली. शहरातील प्राणीप्रेमी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनीही या उपक्रमाला पाठिंबा दिला.

महापालिकेकडून यापूर्वी भटक्या श्वानांसाठी निर्बीजीकरण प्रकल्प राबविला जात आहे. त्याच धर्तीवर आता मांजरांसाठीही ही सुविधा उपलब्ध झाल्याने त्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविणे, पिल्लांचे हाल कमी करणे आणि नागरिकांना दिलासा मिळणे शक्य होणार आहे.

भटक्या प्राण्यांच्या समस्येकडे मानवी दृष्टिकोनातून पाहत शाश्वत उपाययोजना करण्याच्या दिशेने महानगरपालिकेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना प्राणीप्रेमींनी व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande