
अमरावती, 13 जुलै (हिं.स.) महापालिकेतील काम आव्हानात्मक असून शासन, सभागृह व नागरिकांच्या सहभागातून ते पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करणार आहे. कोणते काम प्राधान्यक्रमाने घ्यायचे हे येत्या आठवडाभरात ठरविण्यात येणार आहे. सर्वच कामे आर्थिक बाबींशी निगडित असल्याने महापालिकेची आर्थिक बाजू भक्कम करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे नवनियुक्त मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदवले यांनी म्हटले आहे. नवनियुक्त आयुक्त यांनी आधी सर्व विभागप्रमुखांकडून महापालिकेची माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, येथे आल्यावर स्वच्छतेचा विषय गाजत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासोबतच मनपाची आर्थिक स्थिती हा विषयही महत्त्वाचा आहे. नागरी संस्था असलेल्या मनपात सर्वच बाबी आर्थिक मुद्द्यांशी निगडित असल्याने उत्पन्नवाढीवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. तथापि इतर विषयही महत्त्वाचेच असल्याने प्राधान्य कोणत्या कामास द्यावे, नेमकी सुरवात कोठून करायची, याचा प्राधान्यक्रम येत्या आठवडाभरात निश्चित करण्यात येणार आहे. अनियमिततेच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, काम कोण करतोय यापेक्षा तो कसे करतोय हे बघणे महत्त्वाचे आहे.अनियमितता का होते, हे गुपीत त्याच्या काम करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे, असे सांगताना त्यांनी स्वच्छता कंत्राटावर अंगुलीनिर्देश केला. जीएसटी व कर विभागातून नोकरीस प्रारंभ करणारे डॉ. गोंदवले यांनी नंतर आयएएसची परीक्षा उत्तीर्ण केली. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय सेवेनंतर ते अमरावती महापालिकेत आयुक्त पदावर रूजू झाले आहेत. महावितरण व एमआयडीसीमध्ये कामाचा त्यांना अनुभव आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी