यवतमाळमध्ये १५ ते ३० जुलै विशेष शाळाबाह्य बालक शोधमोहीम
यवतमाळ, 13 जुलै (हिं.स.) | जिल्ह्यात शिक्षणापासून वंचित राहिलेल्या एकाही बालकाची नोंद सुटू नये, यासाठी १५ ते ३० जुलै दरम्यान विशेष शाळाबाह्य शोधमोहीम राबवण्यात येणार आहे. घराघरांत जाऊन शाळाबाह्य, स्थलांतरित आणि अनियमित उपस्थिती असलेल्या मुलांचा शोध
जिल्ह्यातील एकही मूल शाळाबाहेर नको!:15 जुलैपासून विशेष शोधमोहीम


यवतमाळ, 13 जुलै (हिं.स.) | जिल्ह्यात शिक्षणापासून वंचित राहिलेल्या एकाही बालकाची नोंद सुटू नये, यासाठी १५ ते ३० जुलै दरम्यान विशेष शाळाबाह्य शोधमोहीम राबवण्यात येणार आहे. घराघरांत जाऊन शाळाबाह्य, स्थलांतरित आणि अनियमित उपस्थिती असलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यावर भर दिला जाणार आहे. या मोहिमेत शिक्षण विभागासह महिला व बालविकास, समाजकल्याण, आदिवासी विकास, पोलिस प्रशासन आणि विविध विभागांचा समन्वय राहणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

आर्थिक अडचणी, पालकांचे स्थलांतर, कौटुंबिक परिस्थिती किंवा इतर कारणांमुळे काही मुले दरवर्षी शाळेबाहेर जातात. अशा बालकांचा शोध घेण्यासाठी शिक्षण विभागाने यंदाही विशेष नियोजन केले असून, शिक्षकांसह संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी घराघरांत जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. सर्वेक्षणात आढळलेल्या प्रत्येक बालकाची माहिती नोंदवून त्याला वयानूसार जवळच्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच आढावा बैठक होणार आहे.

बैठकीत विविध विभागांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून मोहिमेचे नियोजन अंतिम केले जाणार आहे. जिल्हाधिकारी या मोहिमेचे अध्यक्ष, तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सहअध्यक्ष असतील. शिक्षण, महिला व बालविकास, समाजकल्याण, आदिवासी विकास, कामगार, पोलिस विभाग तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या मोहिमेत सहभागी होणार आहेत. शाळाबाह्य मुलांची अचूक ओळख, त्यांचे समुपदेशन आणि तातडीने शाळेत पुनर्प्रवेश करून त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यावर यंदा विशेष भर दिला जाणार आहे. शिक्षणापासून कोणतेही मूल वंचित राहू नये, यासाठी पालकांनीही सर्वेक्षण पथकांना सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

बसस्थानकांपासून वीटभट्ट्यांपर्यंत शोध शाळाबाह्य बालकांचा शोध घेण्यासाठी मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे. बसस्थानके, रेल्वे स्थानके, सिग्नल, हॉटेल्स, खानावळी, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, वीटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने तसेच इतर कामगार वस्त्यांवर विशेष सर्वेक्षण केले जाणार आहे. याशिवाय दुर्गम खेडी, वाड्या, वस्त्या, तांडे, पाडे, शेतमळे आणि जंगल परिसरात सर्वेक्षण पथके पोहोचणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande