
अमरावती, 13 जुलै (हिं.स.) : राज्याच्या राजकीय वर्तुळात मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी ‘एक दिवस पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत’, असे सूचक वक्तव्य केल्यानंतर युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी त्याला प्रत्युत्तर देत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची पाठराखण केली आहे.
आमदार रवी राणा म्हणाले की, कोणी कितीही वक्तव्ये केली तरी राज्याला न्याय देणारे आणि विकासाला गती देणारे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांचेच आहे. त्यांनी बच्चू कडू यांचे नाव न घेता महायुतीतील काही नेत्यांकडून मुख्यमंत्री बदलाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर नाराजी व्यक्त केली.
कोणी कोणाला खुश करण्यासाठी काहीही वक्तव्ये करोत किंवा फडणवीसांनी केंद्रात जावे आणि नवीन मुख्यमंत्री व्हावा, अशा चर्चा घडवून आणोत; मात्र महाराष्ट्र आणि विशेषतः विदर्भाला मजबूत करण्यासाठी फडणवीसांसारखा सक्षम लोकनेता दुसरा नाही, असा दावा रवी राणा यांनी केला.
राज्यातील विविध भागांतील मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत राणा म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबईचेही मुख्यमंत्री राज्याने पाहिले आहेत. मात्र सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि प्रत्येक घटकाच्या प्रश्नांशी नाळ जोडलेले नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांचे आहे. राज्याची जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचेही त्यांनी सांगितले.
बच्चू कडूंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर
काही दिवसांपूर्वी आमदार बच्चू कडू यांनी महायुतीतील राजकीय समीकरणांवर भाष्य केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीची तयारी करावी आणि देशाची सूत्रे हाती घ्यावीत, तर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा महाराष्ट्रात नेतृत्व करावे, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.
देशात देवाभाऊ आणि महाराष्ट्रात शिंदे असा प्रवास झाला पाहिजे, असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर रवी राणा यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राजकीय चर्चांना उत्तर दिले आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी