
अलिबाग, 13 जुलै (हिं.स.) : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शिवज्योत ग्रुप, उमटे (ता. अलिबाग) यांच्या वतीने उमटे गावात रविवारी ५० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
हवामान बदल, वाढते प्रदूषण आणि मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड यामुळे पर्यावरणासमोर निर्माण झालेल्या समस्यांची जाणीव ठेवून देशी वृक्षांचे संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. केवळ वृक्षारोपण न करता लागवड केलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन आणि संरक्षण करण्याची जबाबदारीही शिवज्योत ग्रुपच्या सदस्यांनी स्वीकारली.
शिवज्योत ग्रुप हा सामाजिक बांधिलकी जपणारा समूह असून वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असतो. पर्यावरण संरक्षणाबरोबरच सामाजिक जनजागृती, ग्रामविकास आणि समाजहिताच्या कार्यात ग्रुपचे सदस्य सातत्याने सक्रिय असतात.
वृक्षारोपणासारख्या उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनाला चालना मिळण्याबरोबरच ग्रामस्थांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होत असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
या उपक्रमात ग्रुपचे अध्यक्ष रूपेश झावरे, उपाध्यक्ष सुशील झावरे तसेच प्रतीक भगत, अमित पुनकर, विनीत भोईर, मंदार झावरे आणि ऋषिकेश झावरे यांनी सहभाग घेतला. सर्व सदस्यांनी उत्साहाने वृक्षलागवड करत भविष्यातही अशाच पर्यावरणपूरक उपक्रमांना सातत्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.
-----------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)