जांभळाला भरपूर फळे आली म्हणजे दुष्काळ पडणार ? कृषी तज्ज्ञांनी फेटाळला गैरसमज
नाशिक, 13 जुलै (हिं.स.) : यंदा उन्हाळ्यात नाशिक जिल्ह्यातील विविध भागांत जांभळाच्या झाडांना मोठ्या प्रमाणात फळधारणा झाल्याचे चित्र दिसून येत आहे. गावोगावी, शिवारात, रस्त्यांच्या कडेला आणि बाजारपेठांमध्ये जांभळांची मोठी आवक झाली आहे. मात्र, ‘जांभळा
जांभळाला भरपूर फळे आली म्हणजे दुष्काळ पडणार ? कृषी तज्ज्ञांनी फेटाळला गैरसमज


नाशिक, 13 जुलै (हिं.स.) : यंदा उन्हाळ्यात नाशिक जिल्ह्यातील विविध भागांत जांभळाच्या झाडांना मोठ्या प्रमाणात फळधारणा झाल्याचे चित्र दिसून येत आहे. गावोगावी, शिवारात, रस्त्यांच्या कडेला आणि बाजारपेठांमध्ये जांभळांची मोठी आवक झाली आहे. मात्र, ‘जांभळाला जास्त फळे आली म्हणजे यंदा दुष्काळ पडणार’ हा समज पूर्णपणे चुकीचा असून त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचे कृषी व वनस्पतीशास्त्र तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

वनस्पतीशास्त्रानुसार जांभूळ हे दीर्घायुषी सदाहरित फळझाड असून ते ८० ते १०० वर्षांहून अधिक काळ जगू शकते. योग्य वातावरण आणि परिस्थिती मिळाल्यास जांभळाच्या झाडाला दरवर्षी फळधारणा होते. काही वर्षांत मात्र फळांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते. यामागे हवामान, झाडाची शारीरिक क्षमता आणि नैसर्गिक जैविक चक्र ही कारणे असतात.

जांभूळ, आंबा यांसारख्या अनेक फळझाडांमध्ये एका वर्षी मोठ्या प्रमाणात आणि पुढील वर्षी तुलनेने कमी फळे येण्याचे नैसर्गिक चक्र आढळते. झाडामध्ये साठवलेली ऊर्जा मोठ्या प्रमाणात फळधारणेसाठी वापरली जाते. अशा वर्षाला ‘ऑन इयर’ असे म्हटले जाते. हा झाडाच्या नैसर्गिक गुणधर्माचा भाग आहे.

हवामानामुळे वाढली फळधारणा

मागील वर्षी झालेला समाधानकारक पाऊस, जमिनीत टिकून राहिलेला ओलावा, फेब्रुवारी-मार्चमधील कोरडे वातावरण, मोहोराच्या काळात अवकाळी पाऊस न होणे आणि योग्य तापमान यामुळे यंदा जांभळाची फळधारणा अधिक झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

कोरड्या हवामानात मधमाशा आणि इतर परागीकरण करणाऱ्या कीटकांची हालचाल वाढते. त्यामुळे फुलांचे यशस्वी परागीकरण होऊन अधिक फळे तयार होण्यास मदत होते.

सोशल मीडियावर जांभळाच्या झाडाला भरपूर फळे येणे म्हणजे झाड मरते किंवा दुष्काळाची चाहूल लागते, अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. मात्र हा केवळ गैरसमज आहे. काही वनस्पतींच्या जीवनचक्रावर आधारित ही संकल्पना जांभळाला लागू होत नाही.

बांबूसारख्या काही वनस्पती अनेक वर्षांनी एकदाच फुलतात आणि त्यानंतर त्यांचे जीवनचक्र पूर्ण होते. मात्र जांभूळ, आंबा आणि फणस यांसारख्या बहुवर्षायू फळझाडांमध्ये अशी प्रक्रिया होत नाही.

दुष्काळाचा अंदाज झाडांच्या फळांवरून नाही

हवामान विभाग पावसाचा अंदाज महासागरातील तापमान, वातावरणीय दाब, मान्सूनची स्थिती, एल-निनो आणि ला-निना यांसारख्या वैज्ञानिक घटकांच्या आधारे वर्तवतो. एखाद्या झाडाला किती फळे आली यावरून संपूर्ण हंगामातील पाऊस किंवा दुष्काळाचा अंदाज बांधता येत नाही.

यंदा जांभळाचे उत्पादन वाढल्याने बाजारात फळांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शेतकरी आणि वनउत्पादन संकलकांनी जांभूळ प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती आणि योग्य बाजार नियोजनाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande