
अमरावती, 13 जुलै (हिं.स.) । अमरावती जिल्ह्यात बोगस बियाण्यांमुळे मोठ्या प्रमाणात पिकांची उगवण न झाल्याने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतांना भाजपा नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी विविध तालुक्यांमध्ये भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पहिल्याच पेरणीत उगवण न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल्याचे निदर्शनास आले.
यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर राणा यांनी उपस्थित कृषी अधिकाऱ्यांना बोगस बियाण्यांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांविरोधात तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे तसेच सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आठ दिवसांत नुकसानभरपाई मिळेल, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक गावातील पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या गंभीर प्रकरणाबाबत राणा यांनी राज्याच्या कृषिमंत्र्यांशी दूरध्वनीवर चर्चा करून दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई व शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याची मागणी केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष नुकसानभरपाई पॅकेजची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बोगस बियाणे पुरवणाऱ्या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करून त्यांचे परवाने रद्द करावेत, अशीही त्यांनी मागणी केली. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत माझा लढा सुरू राहील, अशी भूमिका नवनीत राणा यांनी व्यक्त केली. पाहणीवेळी तालुका कृषी अधिकारी अक्षय क्षिरसागर, पंचायत समिती कृषी अधिकारी रविकांत उईके यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी