
लातूर, 13 जुलै (हिं.स.) : दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या प्राधान्याने सोडवून त्यांना शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील विविध दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी तसेच शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत दिव्यांगांच्या आरोग्य सेवा, पुनर्वसन, कृत्रिम अवयव उपलब्धता, ओळखपत्र, विविध शासकीय योजनांचा लाभ आणि प्रशासकीय सेवांशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत प्रत्येक सोमवारी ग्राम व तालुका स्तरावर आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि अलिम्कोच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींचे मोजमाप करून आवश्यक कृत्रिम अवयव व सहाय्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दिव्यांगांसाठी यूडीआयडी संगणक ऑपरेटरना प्रशिक्षण देणे, दिव्यांगांची आधारकार्डे अद्ययावत करणे तसेच सत्यापन ॲप नोंदणीसाठी ग्रामसेवकांना आवश्यक सूचना देण्याचे निर्देशही संबंधित विभागांना देण्यात आले.
पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ प्राधान्याने मिळावा आणि त्यांचा अंत्योदय योजनेत समावेश करण्याबाबत जिल्हा पुरवठा विभागाला सूचना करण्यात आल्या.
जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत जिल्ह्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती संकलित करून त्यांच्या गरजेनुसार साहित्य उपलब्धतेसाठी गुगल फॉर्मद्वारे नोंदणी प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत दिव्यांगांसाठी विशेष शिबिरे घेऊन वाहन चालविण्याचा परवाना उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता राजू गायकवाड, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक बसवराज पैके, विशेष शिक्षक व्यंकट लामजने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis