
छत्रपती संभाजीनगर, 13 जुलै (हिं.स.) : राज्यात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने अन्नभेसळ आणि निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांविरोधातील कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कारवायांना अधिक वेग आला असून, दूध भेसळ, हॉटेल्स, मेडिकल दुकाने आणि विविध खाद्य उद्योगांवर सातत्याने धाडी टाकल्या जात आहेत. याच मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगरातील दोन खाद्यतेल रिपॅकिंग युनिट्सवर छापा टाकून तब्बल २ कोटी ९३ लाख रुपयांहून अधिक किमतीचा संशयित निकृष्ट दर्जाचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अचानक कारवाई करत दोन्ही युनिट्सची तपासणी केली. यावेळी अत्यंत अस्वच्छ वातावरणात खाद्यतेलाचे रिपॅकिंग सुरू असल्याचे आढळून आले. तपासादरम्यान वापरलेले टिन पुन्हा वापरणे, यंत्रसामग्रीवर धूळ, गंज व घाण साचलेली असणे, दुर्गंधीयुक्त तेलाचे टब, फूड ग्रेड प्रमाणपत्रांचा अभाव, तेलाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा नसणे तसेच आवश्यक तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती न केल्याच्या गंभीर त्रुटी उघड झाल्या.
या अनियमितता लक्षात घेऊन संबंधित दोन्ही आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या खाद्यतेलाचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, अहवालानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis