
लातूर, 13 जुलै (हिं.स.)।
देवणी तालुक्यातील विजयनगर (गौंडगाव) येथे पती-पत्नीच्या अतूट प्रेमाची आणि आयुष्यभराच्या सहजीवनाची हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. अल्पशा आजाराने शिवराज नागशेट्टी बिराजदार (वय ६०) यांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी पत्नीला समजताच
सिकंदराबाई शिवराज बिराजदार (वय ५४) यांना असह्य झाली. पतीच्या वियोगाचे दुःख सहन न झाल्याने त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि काही वेळातच त्यांनीही अखेरचा श्वास घेतला एकाच घरातून पती-पत्नीच्या निधनाच्या दुर्दैवी घटनेमुळे विजयनगर (गौंडगाव) परिसरात शोककळा पसरली आहे.
आयुष्यभर सुख-दुःखात एकमेकांची साथ देणाऱ्या या दाम्पत्याने मृत्यूनंतरही एकमेकांची साथ न सोडल्याची भावना व्यक्त करीत अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
शिवराज बिराजदार हे शांत, आणि सर्वांशी मनमिळावू आपुलकीने वागणार व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. तर सिकंदराबाई या प्रेमळ, कुटुंबवत्सल आणि पतीप्रती अपार जिव्हाळा
असलेल्या गृहिणी होत्या. पतीच्या निधनाचा धक्का त्यांना इतका असह्य झाला की त्यांनीही या जगाचा निरोप घेतला. वलांडीचे सामाजिक कार्यकर्ते अरुण पाटील यांच्या त्या आत्या मामा होत. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी तसेच नातवंडे, असा मोठा आप्तपरिवार परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून, अंत्यदर्शनासाठी सांत्वन आणि कुटुंबीयांचे करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्यांच्यावर स्वतःच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेने 'खरे सहजीवन म्हणजे आयुष्यभराची साथ' या भावनेची पुन्हा एकदा प्रचिती आली असून, बिराजदार कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखद प्रसंगाबद्दल सर्व स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis