
अमरावती, 13 जुलै (हिं.स.)।
कोणाच्या घरात अथवा मानवी वस्तीत साप निघाल्यास स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्पमित्र हे सापांचा जीव वाचवून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडतात. परंतु चांदूररेल्वे, देवगाव, धामणगावरेल्वे आणि मंगरूळ दस्तगीर येथील सर्पमित्रांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी साप पकडण्याचे काम बंद करण्याचा निर्णय येथील विश्रामगृहात झालेल्या बैठकीत घेतला. त्यामुळे आता मानवी वस्तीत शिरलेले साप कोण पकडणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मानवी वस्तीत शिरलेल्या सापांना सुरक्षितपणे पकडून त्यांना कोणतीही दुखापत न करता जंगलात किंवा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देणारे व्यक्ती म्हणजे सर्पमित्र. परंतु, चांदूररेल्वे, देवगाव, धामणगावरेल्वे आणि मंगरूळ दस्तगीर येथील सर्पमित्रांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी रविवारपासून (ता. १२) साप पकडण्याचे काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. साप पकडताना सर्पदंश, अपघात व इतर जीवित धोक्याच्या घटनांमध्ये वनविभागाकडून कोणतीही ठोस मदत किंवा संरक्षण मिळत नाही, असे त्यांचे म्हणणे असून राज्यभरातील सर्व सर्पमित्रांनी एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी लढा उभारावा, अशी हाकही देण्यात आली आहे. सर्पमित्रांच्या मागण्यांवर वनविभागाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून, तोपर्यंत आंदोलन सुरू राहण्याची भूमिका सर्पमित्रांनी घेतली आहे. धामणगावरेल्वेच्या शासकीय विश्रामगृहात रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, पावसाला सुरवात झाल्याने साप निघण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच सर्पमित्र संपावर गेल्याने आता मानवी वस्तीत शिरलेले साप कोण पकडणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सापांविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच आम्ही सापांचा जीव वाचवितो. स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्पमित्र नागरिकांना मदत करतात. त्यामुळे त्यांना शासकीय पातळीवर ‘फ्रंटलाइन वर्कर’चा दर्जा देण्यात यावा. सर्पदंश झाल्यास रुग्णालयाचा तातडीने शासनाने खर्च द्यावा आणि अपघाती विमा मिळावा, अशी मागणी अनेकदा लावून धरण्यात आली आहे. -अशफाक शहा सर्पमित्र, धामणगाव रेल्वे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी