जोगीनगुंफा गावात पट्टेदार वाघाचा शिरकाव; ग्रामस्थांनी धाडसाने जंगलाकडे पिटाळले
वर्धा, १३ जुलै (हिं.स.) : शिवणफळ जंगलालगत असलेल्या जोगीनगुंफा गावात रविवारी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघ थेट गावात शिरल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. गावातील एका घराच्या आडोश्याजवळ वाघ दिसताच ग्रामस्थांनी आरडाओरड करत
घराच्या आडोशाला पट्टेदार वाघ


वर्धा, १३ जुलै (हिं.स.) : शिवणफळ जंगलालगत असलेल्या जोगीनगुंफा गावात रविवारी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघ थेट गावात शिरल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. गावातील एका घराच्या आडोश्याजवळ वाघ दिसताच ग्रामस्थांनी आरडाओरड करत धाडसाने त्याला जंगलाच्या दिशेने पिटाळून लावले.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, वाघ गावातील घरांच्या परिसरात शांतपणे फिरताना दिसला. वाघाचे दर्शन होताच नागरिकांनी एकमेकांना सतर्क केले. त्यानंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकत्र येऊन हाका देत आणि आवाज करत वाघाला पुन्हा जंगलाच्या दिशेने हुसकावून लावले. या घटनेनंतर संपूर्ण गावात रात्रभर सतर्कता बाळगण्यात आली.

जोगीनगुंफा व परिसरात वाघाचा वावर आता नित्याचाच झाला असून, यापूर्वीही अनेक वेळा वाघ गावात शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. विशेषतः महिला, लहान मुले आणि शेतकऱ्यांमध्ये अधिक चिंतेचे वातावरण असून, सायंकाळनंतर घराबाहेर पडताना नागरिक सावधगिरी बाळगत आहेत.

स्थानिकांच्या माहितीनुसार, शिवणफळ जंगल परिसरात दोन प्रौढ पट्टेदार वाघ आणि पिल्लांसह एक वाघीण अशा एकूण पाच ते सहा वाघांचा वावर आहे. ताडगाव, कोरा, पिंपळगाव, शिवणफळ आणि जोगीनगुंफा परिसरात या वाघांचा नियमित संचार होत असल्याने वनालगतच्या गावांतील नागरिक सतत धास्तावलेल्या अवस्थेत आहेत.

यापूर्वी रासा गावात अस्वल घरात शिरल्याची घटना घडली होती. वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने वाघांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवून गस्त वाढवावी, गावांमध्ये जनजागृती करावी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande